पाठ्यपुस्तकांचा जिल्ह्यात तुटवडा
By admin | Published: August 4, 2015 01:06 AM2015-08-04T01:06:34+5:302015-08-04T01:06:34+5:30
सर्व शिक्षा अभियानांतर्गत जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागामार्फत जिल्हा परिषद व अनुदानित शाळेतील
गडचिरोली : सर्व शिक्षा अभियानांतर्गत जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागामार्फत जिल्हा परिषद व अनुदानित शाळेतील इयत्ता पहिली ते आठवीपर्यंच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके योजनेंतर्गत सन २०१५-१६ या सत्रात पाठ्यपुस्तके वितरित करण्यात आले. मात्र गडचिरोली तालुक्यासह संपूर्ण जिल्हाभरात काही शाळांमध्ये पाठ्यपुस्तकांचा तुटवडा निर्माण झाला आहे. पात्र शाळांतील जवळपास १० टक्के विद्यार्थी मोफत पाठ्यपुस्तकाच्या लाभापासून वंचित असल्याची माहिती आहे.
जि.प.च्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने सर्व शिक्षा अभियानांतर्गत इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक वितरणाचे नियोजन मे महिन्यात करण्यात येते. यासाठी शिक्षण विभागाच्या वतीने सर्व तालुक्यातील जिल्हा परिषद व अनुदानित शाळांची संख्या, या शाळांमधील दाखल विद्यार्थी संख्या मागविली जाते. यानुसार नियोजन केले जाते. त्यानंतर शासनाकडे पाठ्यपुस्तकांची मागणी केली जाते. गडचिरोली जिल्ह्यात बाराही पंचायत समितीस्तरावर असलेल्या गटसाधन केंद्रात पाच टप्प्यात यंदा पाठ्यपुस्तके उपलब्ध झाली. मात्र जिल्ह्यातील अनेक शाळांमधील बऱ्याच विद्यार्थ्यांना सर्व शिक्षा अभियानांतर्गत पाठ्य पुस्तके मिळाली नाहीत. त्यामुळे विद्यार्थी पाठ्यपुस्तकापासून वंचित आहेत. जिल्हाभरात ९० टक्के विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक वितरित करण्यात आले असून १० टक्के विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके मिळाली नाहीत, अशी माहिती आहे.
जि.प. प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने १२ ही तालुक्यातून एकूण १ हजार ८७८ शाळा मोफत पाठ्यपुस्तक वितरणासाठी मंजूर करण्यात आल्या. यात जि.प. व अनुदानित शाळांचा समावेश असून १ लाख ३२ हजार ४१४ लाभार्थी विद्यार्थ्यांसाठी शिक्षण विभागाने शासनाकडे ७ लाख ४० हजार ८० पाठ्यपुस्तकांची मागणी केली. बाराही तालुक्यांसाठी तेवढेच पाठ्यपुस्तके चार ते पाच टप्प्यात उपलब्ध झाली. प्राप्त झालेली ७ लाख ४० हजार ८० पाठ्यपुस्तकांचे इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना वितरण करण्यात आले आहे, अशी माहिती शिक्षण विभागाकडून मिळाली आहे. जिल्ह्यातील इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना १०० टक्के मोफत पाठ्यपुस्तके वितरित करण्यात आले असल्याचे जि.प. शिक्षण विभागाकडून सांगण्यात येत आहे. मात्र गडचिरोली तालुक्यात पाठ्यपुस्तके कमी पडली आहेत. पाठ्यपुस्तकांच्या तुटवड्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. गडचिरोली पंचायत समिती अंतर्गत सर्व केंद्रातील जि.प. व अनुदानित शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांची एकूण संख्या १५ हजार ५९७ आहे. पात्र विद्यार्थ्यांना पुस्तके न मिळाल्याने गडचिरोली शहरातील पालक शाळांमध्ये विचारणा करीत आहे.
गडचिरोलीला ७५० संच हवेत
गडचिरोली तालुक्यात नऊ केंद्र असून एकूण १०२ प्राथमिक शाळा आहेत. गडचिरोली गटसाधन केंद्राच्या वतीने तालुक्यातील सर्व केंद्रातील शाळांना पाठ्यपुस्तके पुरविण्यात आली. मात्र तालुक्यात काही विद्यार्थ्यांसाठी पाठ्यपुस्तके कमी पडली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. गडचिरोली गटसाधन केंद्राला इयत्ता पहिलीच्या सर्व विषयाचे १०० संच, दुसरीचे ५० संच, तिसरीचे ५० संच, चौथीचे ५० संच, पाचवीचे ३०० संच, सहावीचे १००, सातवीचे १०० व आठवीचे ५० असे एकूण ७५० संच पुस्तके आवश्यक असल्याची माहिती आहे. येथील काही शिक्षक पाठ्यपुस्तकांसाठी गटसाधन केंद्रात येरझारा मारीत आहेत.
जुनी पुस्तकेही केली वितरित
जिल्ह्यातील जि.प. व अनुदानित ज्या प्राथमिक शाळांमध्ये पाठ्यपुस्तके विद्यार्थ्यांच्या संख्येत कमी पडली, अशा शाळांनी गतवर्षी वितरित केलेले पाठ्यपुस्तके जुन्या विद्यार्थ्यांकडून मागवून नव्या विद्यार्थ्यांना वितरित केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
जि.प. प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने मोफत पाठ्यपुस्तक वितरणासंदर्भात नियोजन करून सर्व पात्र शाळांच्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके पुरविण्यात आली आहे. एकाही तालुक्यात पाठ्यपुस्तकांचा तुटवडा नाही. पाठ्यपुस्तके कमी पडली असल्याच्या तक्रारी नाहीत. तसे असल्यास संबंधित शिक्षकांनी जि.प. कार्यालयाला यावे.
- माणिक साखरे,
शिक्षणाधिकारी (प्राथमिक)