रस्त्यालगत वाहनांवर कारवाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 04:35 AM2021-02-13T04:35:36+5:302021-02-13T04:35:36+5:30
दुर्गम भागातील माेबाइल सेवा कुचकामी आलापल्ली : येथे बीएसएनएलच्या वतीने थ्री-जी सेवा बसविण्यात आली आहे. मात्र ही थ्री-जी ...
दुर्गम भागातील माेबाइल सेवा कुचकामी
आलापल्ली : येथे बीएसएनएलच्या वतीने थ्री-जी सेवा बसविण्यात आली आहे. मात्र ही थ्री-जी सेवा केवळ नावापुरतीच असल्याचे दिसून येत आहे. या ठिकाणी बीएसएनएलचा इंटरनेट स्पीड टू-जी सेवेप्रमाणे दिली जात आहे. नागरिकांकडून थ्री-जी सेवेचे पैसे घेतले जात असून, सेवा मात्र टू-जी प्रमाणे दिली जात आहे.
रस्त्यांवर बांधकाम साहित्य; कारवाई करा
धानोरा : शहरातील विविध भागात घराचे बांधकाम सुरू असून, बांधकाम साहित्य रस्त्यावर ठेवत आहेत. लोखंडी गज तोडण्याचे कामही रस्त्यावरच करण्यात येते. त्यामुळे अडथळा निर्माण झाला आहे. नगर पंचायतीच्या वतीने कोणतीही कारवाई करण्यात येत नाही. त्यामुळे याचे प्रमाण वाढत आहे.
पशुखाद्यांच्या किमतीत भरमसाठ वाढ
आलापल्ली : दुभत्या व कष्टाचे काम करणाऱ्या जनावरांना सरकी, ढेप, कडधान्यांचा कोंडा चारला जातो. यामुळे जनावर सुदृढ राहून दूध जास्त देते. वाढत्या महागाईचा फटका पशुखाद्यांनाही बसला आहे. किमती १० टक्क्यांनी वाढल्या. मात्र, त्या मानाने दुधाचे व दुधाच्या पदार्थांचे भाव वाढले नाही.
नदीवर बंधारा बांधा
वैरागड : वैरागडजवळून वाहणाऱ्या सती नदीवर बंधारा बांधल्यास परिसरातील शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध हाेण्यास मदत हाेईल. सिंचन विभागाने यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. विशेष म्हणजे वैरागड परिसरात एकही माेठा सिंचन प्रकल्प नाही. त्यामुळे बंधाऱ्याची गरज आहे.
मास्कचा वापर घटला
गडचिराेली : गेल्या दाेन ते तीन दिवसांपासून जिल्ह्याच्या ग्रामीण व शहरी भागात काेराेनाचे रुग्ण कमी हाेत आहेत. त्यामुळे बरेच लाेक ताेंडावर मास्क न बांधता बाजारपेठेत फिरत असल्याचे दिसून येते. पूर्वीसारखी काेराेना संसर्गाची भीती आता उरली नाही. फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत आहे.
तलावांच्या दुरुस्तीमुळे सिंचन वाढले
सिरोंचा : तालुक्यातील मामा तलावाच्या माध्यमातून धान पिकाला सिंचनाची सुविधा उपलब्ध होते. येथील बहुतांश तलाव जीर्णावस्थेत पोहोचले होते. त्यामुळे त्यांची पाणी साठवण क्षमता कमी झाली होती. ही बाब लक्षात घेऊन शासनाने मामा तलाव व कालव्यांच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले होते. मामा तलावांचे दुरुस्ती झाल्याने सिंचनाचे क्षेत्र वाढण्यास मदत झाली आहे.
ओव्हरलोड वाहतूक बंद करण्याची मागणी
देसाईगंज : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर ओव्हरलोड वाहतुकीचे प्रमाण वाढले आहे. यामुळे अपघातसुद्धा वाढले. सदर ओव्हरलोड वाहतुकीकडे ठाणेदार व परिवहन अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत.
कुरखेडातील अंतर्गत नाल्या तुंबल्या
कुरखेडा : शहरातील नाल्यांचा प्रशासनाच्या वतीने अनेक दिवसांपासून नाल्यांचा उपसा करण्यात आला नाही. त्यामुळे नाल्यांमध्ये गाळ, प्लॅस्टिक व इतर कचरा साचला असल्याने पाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण झाला आहे. परिणामी पाण्याचे डबके निर्माण झाले आहे.
कचरा टाकू नका
आलापल्ली : शहरातील अनेक वॉर्डातील नागरिक रस्त्यावर कचरा टाकतात. त्यामुळे दुर्गंधी पसरत आहे. उलट काही लोक गावाबाहेर जाणाऱ्या रस्त्यावर कचरा टाकतात. त्यामुळे दुर्गंधी निर्माण झाली आहे. अशा नागरिकांवर प्रशासनाने कारवाई करावी, अशी मागणी आहे.
स्मशानभूमींची दुरवस्था वाढली
कुरखेडा : जिल्हा परिषद प्रशासनामार्फत दहन व दफनभूमी बांधण्याची योजना गेल्या काही वर्षांपासून हाती घेण्यात आली असली तरी ग्रामीण भागातील अनेक गावांतील जुन्या स्मशानभूमीची दुरवस्था झाली आहे. काही ठिकाणचे दहनशेड मोडकळीस आले असून, स्मशानभूमीत जाण्यासाठी रस्तादेखील नाही.
मामीडीताेगूजवळ पूल बांधण्याची मागणी
झिंगानूर : झिंगानूर ते सिरकोंडा या मुख्य रस्त्यावर मामीडीतोगू नाला आहे. या नाल्यावर पूल बांधण्यात यावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. पूल नसल्याने पावसाळ्यात या मार्गावरील वाहतूक ठप्प राहते. त्यामुळे पुलाची निर्मिती होणे आवश्यक आहे.
सूर्यडाेंगरी रस्ता खड्डेमय
वडधा : परिसरातील देलाेडा ते सूर्यडाेंगरी मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडून दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या मार्गाने आवागमण करणाऱ्या नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. या मार्गावर नेहमी वाहनांची वर्दळ असते.
दुर्गम भागात कर्मचारी राहातच नाही
धानोरा : धानोरा तालुक्यासह अहेरी उपविभागातील तसेच आरमोरी, देसाईगंज, आरमोरी, कोरची व कुरखेडा तालुक्याच्या दुर्गम भागात कार्यरत व दररोज अपडाऊन करत आहेत. हे कर्मचारी दुर्गम भागात राहात नसल्यामुळे ते कार्यालयात नियमित हजर राहात नाहीत. यामुळे ग्रामीण भागातील कार्यालये ओस पडत आहेत.
हुक टाकून विजेची चोरी सुरूच
वैरागड : महावितरणचे बहुतांश कर्मचारी घरूनच कारभार हाकत असल्याने दुर्गम व ग्रामीण भागात विजेची चोरी मोठ्या प्रमाणात केली जात आहे. याचा फटका महावितरणला बसत आहे. त्यामुळे महावितरणने लक्ष देण्याची मागणी सुज्ञ ग्राहकांकडून होत आहे. मुलचेरा तालुक्याच्या ग्रामीण भागात वीजचोरीचे प्रमाण अधिक आहे.
पशुधन सांभाळताना पशुपालक त्रस्त
अहेरी : अहेरी उपविभागासह संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात पशुधनाची संख्या मोठी आहे. मात्र, बऱ्याचशा पशुपालकांकडे हाडकुळ्या गायी व बैल आहेत. या पशुधनाची व्यवस्था सांभाळताना शेतकऱ्यांना त्रास होत आहे. अनेक शेतकरी असे पशुधन विकण्याच्या तयारीत आहे.
आकाशवाणी केंद्र निर्मितीचे काम थंडावले
गडचिरोली : गडचिरोली येथे आकाशवाणी केंद्र उभारण्याचा निर्णय केंद्रीय गृहमंत्रालयाच्या सूचनेनंतर केंद्र सरकारने घेतला होता. मात्र, आकाशवाणी केंद्रनिर्मितीचे काम अद्यापही थंडबस्त्यात आहे.
भरधाव वाहनांवर कारवाई थंडबस्त्यात
आलापल्ली : शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असून, त्या तुलनेत वाहनांची संख्याही वाढत आहे. मात्र, अनेक वाहनधारक रस्त्यावरून सुसाट वेगाने वाहने चालवतात. त्यामुळे अनेक अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. मात्र, प्रशासनाकडून होणारी कारवाई थंडबस्त्यात आहे.