दुष्काळात मजुरांना दिलासा : ९६ हजार ७४७ कुटुंब प्रमुखांना लाभगडचिरोली : गडचिरोली वनवृत्त प्रादेशिक कार्यालयांतर्गत जिल्ह्यातील आलापल्ली, भामरागड, सिरोंचा, गडचिरोली व वडसा या पाचही वन विभागाने सन २०१४-१५ या वर्षातील तेंदू संकलन करणाऱ्या तब्बल ९६ हजार ७४७ कुटुंब प्रमुखांना चालूू वर्षात आतापर्यंत १९ कोटी ४७ लाख ८ हजार ८९० रूपयांचा बोनस वितरित केला आहे. बोनस वाटपाची सरासरी टक्केवारी ९४.७९ आहे. तेंदू बोनस मिळाल्याने दुष्काळी परिस्थितीत तेंदू मजुरांना दिलासा मिळाला आहे.वन विभागामार्फत गेल्या अनेक वर्षांपासून तेंदू संकलन करणाऱ्या मजुरांना बोनस वितरित करण्याची योजना आहे. तेंदू संकलन हंगाम आटोपल्यावर वर्षभरानंतर वन विभागाकडून कार्यवाही करून तेंदू बोनसचे वाटप केले जाते. सन २०१४-१५ या वर्षात तेंदू संकलन करणाऱ्या मजुरांना बोनस वाटपाची कार्यवाही जून २०१६ पासून सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत पाचही वन विभागामार्फत एकूण ९६ हजार ७४७ तेंदू संकलन करणाऱ्या कुटुंब प्रमुखांना एकूण १९ कोटी ४७ लाख ८ हजार ८९० रूपये बोनसच्या स्वरूपात वितरित करण्यात आली आहे. वन विभागामार्फत अद्यापही तेंदू बोनस वाटपाची कार्यवाही सुरू असून ती अंतिम टप्प्यात आहे. आलापल्ली वन विभागाने यंदा ११ हजार ८२० कुटुंब प्रमुखांना १ कोटी ८८ लाख २७ हजार ८९७ रूपये बोनसच्या स्वरूपात वितरित केले आहे. वितरित करण्यात आलेल्या कुटुंब संख्येची टक्केवारी ९५.८१ असून वाटप करण्यात आलेल्या रक्कमेची टक्केवारी ९५.८७ आहे.भामरागड वन विभागाने १८ हजार ५५ कुटुंब प्रमुखांना ६ कोटी ७५ लाख १ हजार ९७७ रूपये बोनसच्या स्वरूपात वितरित केले असून याचा ९५.८२ टक्के कुटुंबांना लाभ मिळालेला आहे. वाटप केलेल्या रक्कमेची टक्केवारी ९६.२९ आहे. सिरोंचा वन विभागाने १० हजार १६६ कुटुंब प्रमुखांना २ कोटी ६८ लाख ७६ हजार २७६ रूपये बोनसच्या स्वरूपात वितरित केले आहे. या वन विभागात बोनसचा लाभ मिळालेल्या कुटुंबाची टक्केवारी ९५.८७ आहे. तर वाटप केलेल्या बोनस रक्कमेची टक्केवारी ९६.२७ आहे.गडचिरोली वन विभागाने २८ हजार ६९७ कुटुंब प्रमुखांना ४ कोटी ७० लाख ५ हजार ८३३ रूपये वितरित केले असून लाभ मिळालेल्या कुटुंबांची टक्केवारी ९०.१५ आहे. तर वाटप केलेल्या रक्कमेची टक्केवारी ९०.६ आहे. वडसा वन विभागाने २८ हजार ९ कुटुंब प्रमुखांना ३ कोटी ४४ लाख ९६ हजार ९०७ रूपये बोनसच्या स्वरूपात वितरित केले आहेत. या बोनसचा लाभ मिळालेल्या कुटुंबाची टक्केवारी ९७.२५ तर बोनसची टक्केवारी ९७.०१ आहे. दुर्गम भागात बँक व्यवस्थेअभावी मजूर बोनसपासून वंचित आहेत. (स्थानिक प्रतिनिधी)बँक खात्याच्या अडचणीमुळे पाच टक्के मजूर बोनसपासून वंचितवन विभागाच्या वतीने तेंदू संकलन करणाऱ्या मजुरांना थेट त्यांच्या बँक खात्यात तेंदू बोनसची रक्कम जमा करण्यात येते. मात्र पाचही वन विभागातील काही मजुरांच्या बँक खाते क्रमांकांत प्रचंड अडचणी आहेत. अनेक मजूर कुटुंब प्रमुखांचे बँक खाते आर्थिक व्यवहाराअभावी बंद पडले आहेत. त्यामुळे वन विभागाला अडचणी येत आहेत. तत्काळ बँक खाते क्रमांकात सुधारणा करण्याची सूचना वन विभागाच्या वतीने मजुरांना करण्यात आली आहे. बँक खाते क्रमांकाच्या अडचणीमुळे अद्यापही १ कोटी ७० लाख ४ हजार ३०६ रूपयांची बोनसची रक्कम वितरित करणे शिल्लक आहे.पुढील वर्षी १० घटकातीलच मजुरांना मिळणार बोनससन २०१५-१६ च्या तेंदू हंगामात पाचही वन विभाग मिळून पेसा कायद्यांतर्गत एकूण १२८ तेंदू युनिट होते तर नॉन पेसामधील १० तेंदू युनिट होते. वन विभागामार्फत बोनस देण्याची तरतूद आहे. मात्र पेसा क्षेत्रातील १२८ तेंदू युनिट ग्रामसभांनी घेतले. या घटकातील मजुरांना बोनस देण्याची जबाबदारी वन विभाग घेत नाही. या तेंदू घटकातील मजुरांना बोनस वितरणाची कार्यवाही संबंधित ग्रामसभांवर निर्भर आहे. त्यामुळे पेसा क्षेत्रातील युनिटमधील तेंदू मजुरांना बोनस मिळण्याबाबत प्रश्नचिन्ह आहे.
१९ कोटींचा तेंदू बोनस वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2016 1:07 AM