तालुक्यात बनावट सुगंधित तंबाखूचा काळाबाजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2019 12:17 AM2019-06-14T00:17:05+5:302019-06-14T00:17:23+5:30
तालुक्यात बनावट सुगंधीत तंबाखूचा काळाबाजार मोठ्या प्रमाणात वाढलेला असून तालुक्यात पिसेवडधा, वैरागड व आरमोरी हे बनावट सुगंधित तंबाखू निर्मितीचे प्रमुख केंद्र आणि ठोक व्यावसायिकांचे माहेरघर बनले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
आरमोरी : तालुक्यात बनावट सुगंधीत तंबाखूचा काळाबाजार मोठ्या प्रमाणात वाढलेला असून तालुक्यात पिसेवडधा, वैरागड व आरमोरी हे बनावट सुगंधित तंबाखू निर्मितीचे प्रमुख केंद्र आणि ठोक व्यावसायिकांचे माहेरघर बनले आहे.
साध्या तंबाखूवर केमिकलद्वारे प्रक्रिया करून व मशीनद्वारे पॅकींग करून बनावट सुगंधित तंबाखू तयार केला जात आहे. हा बनावट तंबाखू ग्रामीण भागात दिवसाढवळ्या सर्रास विकला जात आहे. त्यामुळे बनावट सुगंधित तंबाखूचे जाळे आरमोरी तालुक्यात खोलवर रूजलेली आहे. मात्र याकडे अन्न व औषध प्रशासन व पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांनी डोळेझाक केली आहे. सुगंधित तंबाखू विक्री करण्यावर व बाळगण्यावर बंदी घालून राज्य शासनाने तंबाखूविरोधी कडक कायदा केला. मात्र या कायद्याला बगल देत आरमोरी तालुक्यातील ठोक व्यावसायिकांनी बनावट सुगंधीत तंबाखू निर्मितीचा उद्योग सुरू केला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हा व्यवसाय तेजीत सुरू असून अन्न व औषध प्रशासन विभागाच्या दुर्लक्षितपणामुळे या व्यवसायाला अच्छे दिन आलेले आहेत. पिसेवडधा, वैरागड, आरमोरी येथील ठोक तंबाखू व्यावसायिक नागपूर व पराज्यातून साधा तंबाखू आणून आपल्या गोडाऊनमध्ये केमिकलचा वापर करून बनावट भेसळयुक्त सुगंधित तंबाखूची निर्मिती करीत आहेत. हा बनावट तंबाखू छुप्या पध्दतीने तालुक्यात व जिल्ह्याच्या अनेक भागात विकल्या जातो. वैरागड, पिसेवडधा, आरमोरी तंबाखू निर्मितीचे, कच्चा माल व तयार केलेला सुगंधित तंबाखू साठवणूक करण्याचे गोदाम असल्याची चर्चा आहे. याशिवाय आरमोरी, बर्डी येथील ठोक तंबाखू व्यावसायिकासोबतच अनेकांनी या धंद्यात उडी घेतली आहे.
केवळ लहान पानटपऱ्यांवर कारवाई
बनावट सुगंधित तंबाखूचा खर्रा खाण्याच्या माध्यमातून अनेकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. मात्र अन्न व औषध प्रशासन विभाग याबाबत मौन धारण करून आहे. केवळ लहान पानटपºयांवर कारवाई करणाºया अधिकाऱ्यांना बडे व्यावसायिक दिसत नाही का, असा सवाल उपस्थित होत आहे. ठोक व्यावसायिकांवर कुठलीही मोठी कारवाई होत नसल्याने हा धंदा मोठ्या प्रमाणात फोफावला आहे. सदर धंद्यात लाखोंची उलाढाल सुरू असून या व्यावसायिकाचे जाळे जिल्ह्यातच नव्हे तर जिल्ह्याबाहेरही पसरले आहे.