लाेकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : मार्कंडादेव येथील प्रसिद्ध शिवमंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम गेल्या ४ ते ५ वर्षांपासून रखडले आहे. पण आता हे काम मार्गी लागण्याची आशा निर्माण झाली आहे. खासदार अशोक नेते यांनी दिल्लीत पुरातत्त्व विभागाच्या अतिरिक्त महानिर्देशकांची भेट घेऊन त्यांनी परिस्थितीची जाणीव करून दिली. त्यामुळे येत्या १० दिवसांत पुरातत्त्व विभागाची एक चमू संपूर्ण बांधकामाची पाहणी करण्यासाठी येणार आहे. या धार्मिक पर्यटनस्थळाच्या विकासाच्या दृष्टीने ही चमू सर्वेक्षण करणार असल्याचे अतिरिक्त महानिर्देशकांनी खासदार नेते यांना कळविले. देवस्थानच्या विश्वस्थांनी अनेक वेळा निवेदने देऊनही त्याकडे पुरातत्त्व विभागाने पूर्णतः दुर्लक्ष केले होते. अप्रतिम शिल्पकलेचा नमुना असलेल्या मार्कंडा पर्यटनस्थळाचा विकास व्हावा व मंदिराचा जीर्णोद्धार व्हावा म्हणून सातत्याने प्रयत्न सुरू होते. अखेर खासदार अशोक नेते यांनी पुरातत्व विभागाच्या अतिरिक्त महानिर्देशकांच्या ही बाब निदर्शनास आणून दिली. रखडलेले मार्कंडा देवस्थानच्या जीर्णोद्धाराचे काम विनाविलंब पूर्ण करण्यास त्यांना सांगितले.
केंद्रीय पर्यटनस्थळांच्या यादीत येणार
खासदार अशोक नेते यांनी पुरातत्त्व विभागाच्या एडीजी यांच्याशी चर्चा करताना सांगितले की, मार्कंडा देवस्थान महाराष्ट्रातील महत्त्वाचे तीर्थक्षेत्र व धार्मिक पर्यटनस्थळ आहे. यात्रेदरम्यान लाखो भाविकांची उपस्थिती राहत असल्याने त्यांना सोयीसुविधा निर्माण करण्यासाठी मार्कंडा परिसराचा सर्वांगीण विकास होणे गरजेचे आहे. लोकसभेतही त्यांनी हा प्रश्न उपस्थित करून पुरातत्त्व खात्याचे लक्ष वेधले होते.
मार्कंडा या पर्यटनस्थळाला केंद्रीय पर्यटनस्थळांच्या यादीत समावेश करून विकास करण्याची मागणी त्यांनी केली होती. त्याची दखल घेऊन मंदिर जीर्णोद्धाराचे काम पूर्ण करण्यासोबत या ठिकाणी विकासकामांसाठी निधी मंजूर करण्यात येणार आहे. त्यासाठीच केंद्रीय चमूद्वारे पाहणी केली जाणार असल्याचे खा. अशोक नेते यांनी सांगितले.