झिंगानूर : झिंगानूर-सिरोंचा मार्गावर वन विभागाने लाखो रुपये खर्चून बंधारा बांधला. जवळपासच्या शेतीला पाण्याची सुविधा उपलब्ध होईल व वन्यजीवांसाठीही पाणी राहील, या उद्देशाने बंधाऱ्याचे बांधकाम करण्यात आले; मात्र अल्प कालावधीतच बंधारा फुटला आहे. सातत्याने मागणी करूनही प्रशासनाने याेग्य नियाेजन करून बंधाऱ्याची दुरुस्ती केली नाही.
गंजलेल्या खांबाने अपघाताचा धोका
गडचिराेली : येथील काही वॉर्डांत रस्त्यालगत विद्युत खांब गंजले आहेत. सदर खांब कोसळून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हा खांब बदलण्याची मागणी होत आहे. जिल्हाभरात अशा प्रकारचे गंजलेले शेकडो खांब आहेत. त्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे; मात्र या समस्येकडे कायम दुर्लक्ष आहे.
सौरदिव्यांसाठी नव्याने बॅटऱ्या उपलब्ध करा
आष्टी : विद्युत वाचविण्यासाठी ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायतींनी सौरदिवे लावले आहेत; मात्र यातील बहुतांश सौरदिव्यांच्या बॅटऱ्या चोरीला गेल्या आहेत. त्यामुळे सौरदिवे केवळ शोभेच्या वस्तू बनल्या आहेत. त्यामुळे नव्याने बॅटऱ्या द्याव्यात, अशी मागणी आहे.
वनहक्क पट्ट्यापासून नागरिक वंचित
कोरची : शासनाने वनहक्क अधिनियम २००६ अन्वये वनजमिनीचे पट्टे देण्याचे धोरण अमलात आणले आहे; मात्र कागदपत्रांच्या अटीमुळे अद्यापही जिल्ह्यातील अनेक गरजू व गरीब नागरिक वन हक्काच्या पट्ट्यापासून वंचित असल्याचे दिसून येत आहे.
चातगावात कव्हरेजची समस्या भारी
धानोरा : तालुक्यातील चातगाव येथील मोबाइल टॉवर व्यवस्थित काम करीत नसल्याने कव्हरेज मिळत नाही. त्यामुळे चातगाव परिसरातील मोबाइलधारक त्रस्त झाले असून, टॉवर दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे. येथील बिघाडाच्या दुरुस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
धोडराज मार्गावर खड्डे; वाहनधारक त्रस्त
भामरागड : भामरागडवरून धोडराज पाच किमी अंतरावर आहे. दरम्यानच्या मार्गावर खड्डे पडले आहेत. मागील सात वर्षांपासून या मार्गाची दुरुस्तीच करण्यात आली नाही. धोडराजवासीय भामरागड येथे शासकीय कामानिमित्त येतात. त्यामुळे या मार्गाची दुरुस्ती करणे आवश्यक आहे. मागील वर्षी या मार्गाच्या दुरवस्थेत आणखी भर पडली. अहेरी उपविभागाच्या विकासासाठी निधी येत असला तरी त्याचा विनियाेग दिसून येत नाही.
शहरातील नाल्या गाळाने बुजल्या
गडचिरोली : शहरात अनेक नाल्यांच्या बाजूला असलेल्या रस्त्यांची वारंवार दुरुस्ती झाल्याने रस्ते उंच आणि नाल्या खाली गेल्या आहेत. शिवाय शहरातील रस्ते अरुंद असल्याने अनेक वाहनेही नालीत पडून अपघात होण्याची शक्यता असते. या नाल्यांवर कोणतेच अच्छादन नसल्यानेही किरकोळ अपघात घडतात.
सिरोंचा तालुक्यातील बस थांब्यांची दुर्दशा
सिरोंचा : अहेरी ते गडचिरोली आगारातून सिरोंचा तालुक्याच्या ग्रामीण भागात बस सोडल्या जातात. प्रवाशांच्या सोयीसाठी प्रवासी निवारे बांधण्यात आले आहेत; मात्र या निवाऱ्यांच्या देखभालीकडे दुर्लक्ष झाल्याने त्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. बऱ्याच प्रवासी निवाऱ्यांचे टिनपत्रे वादळाने उडाले आहेत. भिंती पिचकाऱ्यांनी रंगल्या असून, घाणीचे साम्राज्य आहे.
अभयारण्यातील गावांचे पुनर्वसन केव्हा हाेणार!
आष्टी : चामोर्शी तालुक्यातील आष्टी परिसरातील चपराळा अभयारण्यांतर्गत चपराळा व इतर लहान-मोठी चार ते पाच गावे येतात. या अभयारण्यातील वन्य पशूंमुळे गावकऱ्यांना धोका आहे. आजपर्यंत वन्य पशूंचे अनेक हल्ले नागरिकांवर झाले आहेत. त्यामुळे या गावांचे पुनर्वसन करण्याची मागणी होत आहे.
हगणदरीमुक्तीवर प्रश्नचिन्ह
विसोरा : बहुतांश नागरिकांकडे शौचालय आहे; मात्र ग्रामीण भागातील नागरिक शौचालयाचा वापरच करीत नाहीत. परिणामी, शौचालये निकामी झाली आहेत. शौचालयाचा वापर न झाल्याने हगणदरीमुक्त गाव निर्माण करणे अडचणीचे झाले आहे. ग्रामीण भागातील अनेक नागरिक लाेटा घेऊन रस्त्याकडेला जातात.
अल्पवयीनचालकांवर कारवाई नाही
आरमोरी : शहरातून मोठ्या प्रमाणात भरधाव वेगाने वाहने चालवली जात आहेत; मात्र याकडे वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. यामुळे अपघातही घडलेले असून, या भरधाव वाहनचालकांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे; परंतु या मागणीकडे दुर्लक्ष हाेत असल्याने अपघाताची शक्यता बळावली आहे. वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाचा या समस्येकडे कानाडाेळा हाेत आहे.
ग्रामीण भागातील स्मशानभूमींची दुरवस्था
कुरखेडा : जि. प. प्रशासनामार्फत दहन व दफनभूमी बांधण्याची योजना गेल्या काही वर्षांपासून हाती घेण्यात आली असली, तरी अनेक गावांतील जुन्या स्मशानभूमींची दुरवस्था झाली आहे. काही ठिकाणचे दहन शेड मोडकळीस आले असून, स्मशानभूमीत जाण्यासाठी रस्तादेखील नाही. त्यामुळे अंत्यसंस्कारासाठी अनेक अडचणी येतात. स्मशानभूमीचा विकास करावा, अशी मागणी आहे.
इंदिरा गांधी चाैकात स्वच्छतागृह द्या
गडचिरोली : येथील इंदिरा गांधी चौक शहराचे मध्यवर्ती ठिकाण आहे. शहरात कुठेही जाण्यासाठी इंदिरा गांधी चौकातूनच मार्गक्रमण करावे लागते. अनेक नागरिक चौक परिसरात विसावा घेतात. नागरिकांना मुतारीसाठी नाहक त्रास सहन करावा लागतात. या ठिकाणी स्वच्छतागृह निर्माण करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
कोरचीतील रस्ते खड्डेमय
कोरची : तालुक्यातील ग्रामीण व दुर्गम भागातील रस्त्यांची मागील अनेक वर्षांपासून डागडुजी करण्यात आली नाही. त्यामुळे रस्त्यावर गवत उगवले आहे. गावकऱ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. रस्ते दुरुस्ती करण्याची मागणी आहे. खड्ड्यांमुळे अपघात हाेण्याची शक्यता बळावली आहे.
पोर्ला बसस्थानकावर अपघाताची शक्यता
गडचिरोली : तालुक्यातील तसेच गडचिरोली-आरमोरी मार्गावरील वर्दळीचे गाव असलेल्या पोर्ला येथे गतिरोधकाची नितांत गरज आहे; पण ते नसल्यामुळे या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता असते. नेहमीच बसस्थानकावर प्रवाशांची गर्दी असते. वाहनधारक भरधाव वेगात वाहने हाकत असतात, त्यामुळे गतिरोधक उभारावे, अशी मागणी या नागरिकांनी केली आहे.
सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतागृहे बांधा
आरमोरी : शहरात सार्वजनिक मुत्रीघर नसल्याने जनतेने स्वत:हून काही ठिकाणी अघोषित मुत्रीघर तयार केले आहेत. त्यामुळे जवळपासचे दुकानदार व घरमालक कमालीचे त्रस्त आहेत. नगर परिषदेने शहरातील मुख्य ठिकाणी सार्वजनिक मुत्रीघर बांधण्याची गरज आहे.
मूलभूत समस्या साेडविण्याची मागणी
कमलापूर : अहेरी तालुक्यातील महत्त्वपूर्ण गाव म्हणून ओळख असलेल्या कमलापूर येथे सोयी-सुविधांची भरमार असणे जनतेला अपेक्षित होते; परंतु कित्येक वर्षांपासून गावातील नागरिकांना मूलभूत समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. सातत्याने पाठपुरावा करूनही कमलापूर भागातील समस्या मार्गी लागल्या नाहीत.
पशुधन सांभाळताना पशुपालक त्रस्त
अहेरी : अहेरी उपविभागासह संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात पशुधनाची संख्या मोठी आहे; मात्र बऱ्याच पशुपालकांकडे हाडकुळ्या गाई व बैल आहेत. या पशुधनाची व्यवस्था सांभाळताना शेतकऱ्यांना त्रास होत आहे. अनेक शेतकरी असे पशुधन विकण्याच्या तयारीत आहे; मात्र ते खरेदी करण्यासाठी कुणी पुढे येत नसल्याने पशुपालकांची अडचण झाली आहे. पशुधन पाळण्यापेक्षा शेतकरी कुक्कुटपालनाकडे वळत आहे.
अनावश्यक फलकाने साैंदर्यीकरणात बाधा
गडचिरोली : येथील इंदिरा गांधी चौकात अनेक अनावश्यक बॅनर्स, फलक लावण्यात आले आहेत. त्यामुळे चौकातील सौंदर्यीकरणात बाधा येत आहे. त्यामुळे सदर फलक हटविण्याची मागणी आहे. बॅनर्समुळे चौकाच्या सौंदर्यीकरणात बाधा येत आहे.
ट्रॅक्टरचालकांच्या परवान्यावर प्रश्नचिन्ह
एटापल्ली : तालुक्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर ट्रॅक्टरची संख्या वाढली आहे. वाहतूक विषयाचे कुठलेही ज्ञान व नियम अवगत नसलेले तरुण मद्यप्राशन करून ट्रॅक्टर चालवितात. ट्रॅक्टर उलटून आजवर जिल्ह्यात पाच ते दहा नागरिकांचा मागील पाच वर्षांत मृत्यू झाला आहे.
घोट-रेखेगाव मार्ग उखडला
घोट : परिसरातील घोट-रेखेगाव मार्गाची प्रचंड प्रमाणात दुरवस्था झाली आहे. या मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. घोट हे मोठे गाव असल्याने या गावाला रेखेगाव येथील नागरिक विविध कामांसाठी येतात. सदर मार्ग खराब असल्याने नागरिकांना नाहक त्रास होत आहे. या भागातील रस्ता विकासाकडे यंत्रणेचे दुर्लक्ष आहे.
कुटुंब नियोजनाबाबत जनजागृतीची गरज
गडचिरोली : लोकसंख्येला आळा घालण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती झाल्यानंतर कुटुंब नियोजन करण्याचे प्रमाण वाढले असले तरी यामध्ये पुरुषांचे प्रमाण अत्यंत नगण्य आहे. कुटुंब नियोजनात महिला आघाडीवर आहेत. पुरुषांमध्ये जनजागृती करण्याची गरज आहे.
तंटे मिटविण्यात समित्या अपयशी
धानोरा : तालुक्यासह जिल्हाभरात अनेक गावांमध्ये तंटामुक्त समित्या केवळ कागदोपत्री असल्याचे दिसून येते. गावात भांडण, तंटे वाढत आहेत; मात्र समित्या तंटे मिटविण्यात अपयशी ठरत आहेत. जिल्ह्यातील तंटामुक्त समित्या प्रेमीयुगुलांचे विवाह लावून देण्यात पुढाकार घेत असल्याचे चित्र आहे.
मार्गाच्या बाजूला वाहने ठेवणाऱ्यांवर कारवाई करा
गडचिरोली : शहरातील चारही मुख्य महामार्गांच्या बाजूला ट्रक व इतर वाहने उभी ठेवली जातात. अनेकांकडे जागा नसतानाही वाहने खरेदी केली आहेत. रात्रंदिवस रस्त्यावर वाहने राहत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. सदर वाहनांवर कारवाई करावी.
दुर्गम भागात कर्मचाऱ्यांचे अपडाऊन सुरू
धानोरा : धानोरा तालुक्यासह अहेरी उपविभागातील तसेच आरमोरी, देसाईगंज, आरमोरी, कोरची व कुरखेडा तालुक्याच्या दुर्गम भागात कार्यरत व दररोज अपडाऊन करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी सोमवारी कर्तव्याला दांडी मारली. त्यामुळे ग्रामीण भागातील कार्यालये ओस पडली आहेत.
कुपोषित भागामध्ये परसबागेची गरज
गडचिरोली : जिल्ह्यांमध्ये कुपोषणाचे प्रमाण अत्याधिक असल्याने शासनाने त्यावर भाजीपाला व फळरोपांचा उपाय शोधला. आदिवासी कुटुंबांना परसबागेत फळझाड व भाजीपाला लागवडीसाठी प्रोत्साहन द्यावे.
मानधनाअभावी वृद्ध कलावंतांची ससेहोलपट
देसाईगंज : ग्रामीण भागात समाज प्रबोधनाचे मुख्य अंग असलेल्या नाटकातील नाट्य कलावंत आजही उपेक्षितच आहेत. कित्येक कलावंतांपुढे वृद्धापकाळामुळे उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐेरणीवर आहे. शासनाचे मात्र या झाडीपट्टीतील कलावंतांकडे पूर्ण दुर्लक्ष आहे.
तहसील कार्यालयातील रिक्त पदे भरा
गडचिरोली : स्थानिक तहसील कार्यालयात लिपीक वर्गाची अनेक पदे रिक्त आहेत. तहसील कार्यालयाच्या मार्फतीने सर्वसामान्य जनतेच्या कल्याणाच्या अनेक योजना राबविण्यात येतात; मात्र पदे रिक्त असल्याने सदर योजना राबविताना अडचण निर्माण होत आहे. कार्यरत कर्मचाऱ्यांवरही कामाचा भार वाढला आहे.
शहरातील डुकरांचा बंदोबस्त करा
सिराेंचा : शहरात डुकरांचा हैदोस वाढला आहे. नगर पंचायतीचे या डुकरांकडे दुर्लक्ष होत आहे. डुकरांना पकडून त्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. नालीमध्ये दिवसभर डुकरांचा वावर राहत असल्याने नागरिक त्रस्त आहेत.