दुकान बंदचा घेतला फायदा : पावणे दोन लाखांचा ऐवज लंपास; आरमोरी शहरातील घटनाआरमोरी : सराफा व्यावसायिकांचा दुकान बंद आंदोलनाचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी येथील सराफा लाईनमधील सुमंगल ज्वेलर्स नावाचे सराफा दुकान फोडून येथून एकूण १ लाख ७५ हजार रूपयांचे सोना, चांदीचे दागिणे लंपास केल्याची घटना गुरूवारी मध्यरात्री अडीच वाजताच्या सुमारास आरमोरीत घडली. केंद्र सरकारने अर्थसंकल्पामध्ये सोन्या, चांदीच्या दागिण्यावर एक टक्का अबकारी कर लादला आहे. सदर कर वाढ मागे घेऊन अबकारी कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी सराफा असोसिएशनच्या वतीने २ मार्चपासून सराफा दुकाने बंद आंदोलन पुकारण्यात आला आहे. या संधीचा फायदा घेऊन गुरूवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी सुमंगल ज्वेलर्स दुकानाच्या शटरचे कुलूप न तोडता दुकानाचे शटर लोखंडी अवजाराने वाकवून आत प्रवेश केला. दुकानात काही तरी काम सुरू असल्याचे आवाज आल्याने ज्वेलर्स दुकानाच्या शेजारी राहणारा इसम पाहण्यासाठी दुकानाच्या बाहेर आला. दुकानाच्या बाहेर पहारा देणाऱ्या दोन अज्ञात चोरट्यांनी त्याला धमकावून जीवानीशी ठार मारण्याची धमकी दिली. त्यामुळे तो घाबरला. तरीही त्याने रात्रीच दुकान मालक व शेजारच्या दुकानदारांना चोरीच्या घटनेची माहिती फोनवरून दिली. त्यानंतर सदर घटनेची माहिती कळताच आरमोरी पोलीस घटनास्थळी पोहोचेपर्यंत अज्ञात चोरटे दागिणे घेऊन पसार झाले. पोलिसांनी शोधमोहीम राबवूनही चोरट्यांचा पत्ता लागला नाही. घटनास्थळी पोलिसांनी स्वानपथक व अंगुली मुद्रतज्ज्ञही बोलाविले. मात्र चोरटे आरोपी हाती लागले नाही. संपामुळे सराफा दुकान बंद असल्याने दुकानमालक अंकुश खरवडे यांनी महत्त्वाचे दागिणे सुरक्षित ठिकाणी ठेवल्यामुळे फार मोठे नुकसान टाळता आले. आरमोरी शहरात दिवाळीपासून तर आतापर्यंत १७ च्या वर घरफोड्या झाल्या आहेत. मात्र एकाही प्रकरणातील चोरट्यांना पकडण्यात आरमोरी पोलिसांना यश आले नाही. चोरीच्या प्रमाणात वाढ झाल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण असून पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. (वार्ताहर)
चोरट्यांनी सराफा दुकान फोडले
By admin | Published: March 11, 2016 1:56 AM