नक्षलवाद्यांच्या चातगाव दलमचे आत्मसमर्पण, तीन महिलांचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2019 12:12 AM2019-10-10T00:12:30+5:302019-10-10T00:12:41+5:30

एखाद्या दलममधील सर्व सदस्यांनी आत्मसमर्पण केल्याची ही पहिलीच घटना आहे.

Three women surrender, surrendering to Chagaon Dalam of Naxalites | नक्षलवाद्यांच्या चातगाव दलमचे आत्मसमर्पण, तीन महिलांचा समावेश

नक्षलवाद्यांच्या चातगाव दलमचे आत्मसमर्पण, तीन महिलांचा समावेश

Next

गडचिरोली : नक्षल चळवळीला मोठा हादरा देत चातगाव या छोट्या दलमच्या कमांडरसह एकूण पाच सदस्यांनी तसेच इतर दलमच्या दोन अशा एकूण ७ नक्षलवाद्यांनी बुधवारी सायंकाळी गडचिरोली पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले. त्यात ३ महिलांंचाही समावेश आहे. त्या सर्वांवर एकूण ३३ लाख ५० हजार रुपयांचे बक्षीस होते. एखाद्या दलममधील सर्व सदस्यांनी आत्मसमर्पण केल्याची ही पहिलीच घटना आहे.
सहकार्य करीत नाही म्हणून आपल्याच आदिवासी बांधवांचे खून, विकासात्मक कामात आडकाठी, महिलांवर होणारे अत्याचार अशा नक्षलवाद्यांच्या धोरणाला कंटाळून आत्मसमर्पणाचे प्रमाण वाढल्याचे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी सांगितले. आत्मसमर्पण करणारे सर्व जण गडचिरोली जिल्ह्यातीलच रहिवासी आहेत.
आत्मसमर्पित नक्षलवादी : १) राकेश उर्फ गणेश सनकू आचला (३४), हा जून २००६ मध्ये टिपगड दलममध्ये भरती झाला होता. जानेवारी २०१२ पासून चातगाव दलमचा कमांडर म्हणून कार्यरत होता. त्याच्यावर २० चकमकींचे, ७ खुनाचे, २ जाळपोळीचे गुन्हे असून त्याच्यावर राज्य शासनाने ५ लाख ५० हजार रुपयांचे बक्षीस ठेवले होते. २) देवीदास उर्फ मनिराम सोनू आवला (२५), हा २०१४ पासून चातगाव दलमच्या उपकमांडरपदी कार्यरत होता. त्याच्यावर चकमकीचे व खुनाचे गुन्हे आहेत. त्याच्यावर ५ लाखांचे बक्षीस होते. ३) रेश्मा उर्फ जाई दुलसू कोवाची (१९), ही २०१७ मध्ये चातगाव दलममध्ये भरती झाली होती. तिच्यावर चकमकीचे २ व खुनाचा एक गुन्हा दाखल आहे. तिच्यावर ४ लाख ५० हजार रुपयांचे बक्षीस होते. ४)अखिला उर्फ राधे झुरे (२७), ही २०१२ मध्ये कसनसूर दलममध्ये भरती झाली होती. मे २०१९ पासून चातगाव दलममध्ये कार्यरत होती. तिच्यावर चकमकीचे ९, खुनाचे व जाळपोळीचे प्रत्येकी ३ गुन्हे आहेत. तिच्यावर ४ लाख ५० हजार रुपयांचे बक्षीस होते. ५)शिवा विज्या पोटावी (२२), हा २०१४ मध्ये कसनसूर दलममध्ये भरती झाला होता. सप्टेंबर २०१८ पासून चातगाव दलममध्ये कार्यरत होता. त्याच्यावर चकमकीचे ३ गुन्हे असून शासनाने ४ लाख ५० हजार रुपयांचे बक्षीस ठेवले होते. ६)करुणा उर्फ कुम्मे रामसिंग मडावी (२२), ही नोव्हेंबर २०१६ पासून टिपागड दलममध्ये कार्यरत होती. तिच्यावर चकमकीचे २, खुनाचा १, जाळपोळीचे ३ गुन्हे असून ४ लाख ५० हजारांचे बक्षीस होते. ७) राहुल उर्फ दामजी सोमजी पल्लो (२५), हा नोव्हेंबर २०१३ मध्ये कसनसूर दलममध्ये भरती झाला होता. जानेवारी २०१४ पासून प्लाटून नं.३ मध्ये कार्यरत होता. त्याच्यावर चकमकीचे १०, खुनाचे ४ आणि जाळपोळीचे २ गुन्हे आहेत. त्याच्यावर ५ लाख रुपयांचे बक्षीस ठेवले होते.

लोकांनी साथ सोडल्याने चळवळ खिळखिळी
- नक्षल चळवळीला आता लोकांची साथ मिळत नाही. नक्षलवाद्यांची उपासमार होते. पोलिसांचे अभियानही वाढले आहे. त्यामुळे सतत जीवाची भीती असते. नक्षल चळवळीत राहण्यापेक्षा आत्मसमर्पण करणाऱ्यांचे जीवन सुखी आहे हे लक्षात आले. नक्षलवाद्यांकडून लग्न करण्याचीही परवानगी नसते. आता आम्ही सुखाने राहू, अशी भावना आत्मसमर्पित नक्षल कमांडर राकेश उर्फ गणेश सनकू आचला याने पत्रकारांपुढे व्यक्त केली.
- यावर्षी १ जानेवारी ते ९ आॅक्टोबर २०१९ यादरम्यान २३ नक्षलवाद्यांनी गडचिरोली पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले आहे. त्यात ३ डीव्हीसी, १ दलम कमांडर व १ उपकमांडरचा समावेश आहे. याशिवाय २१ जणांना अटक करण्यात पोलिसांना यश आले. पण प्रथमच एखाद्या दलममधील सर्व सदस्यांनी आत्मसमर्पण केल्यामुळे नक्षलवाद्यांचे मनोबल किती ढासळले आहे, हे स्पष्ट होत असल्याचे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे म्हणाले.

Web Title: Three women surrender, surrendering to Chagaon Dalam of Naxalites

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.