कामतळ्यात आदिवासी सांस्कृतिक महोत्सव थाटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2018 01:07 AM2018-12-30T01:07:30+5:302018-12-30T01:08:51+5:30

पेसा कायद्यांतर्गत आदिवासी-मूलनिवासींना मिळालेल्या अधिकारांच्या स्मरणार्थ २४ डिसेंबर हा दिवस दरवर्षी पेसा दिवस म्हणून साजरा केला जातो. त्या अनुषंगाने समन्वयक गाव गणराज्य शिलालेख व गोंडवाना सांस्कृतिक महोत्सव कामतळा व ग्रामसभा मोहगावच्या संयुक्त विद्यमाने कामतळा येथे २४ ते २६ डिसेंबर दरम्यान ......

At the time of the tribal cultural festival in Kamat | कामतळ्यात आदिवासी सांस्कृतिक महोत्सव थाटात

कामतळ्यात आदिवासी सांस्कृतिक महोत्सव थाटात

Next
ठळक मुद्देगटचर्चेतून मार्गदर्शन : सास्कृतिक कार्यक्रमातून आदिवासी संस्कृतीचे दर्शन

लोकमत न्यूज नेटवर्क
धानोरा : पेसा कायद्यांतर्गत आदिवासी-मूलनिवासींना मिळालेल्या अधिकारांच्या स्मरणार्थ २४ डिसेंबर हा दिवस दरवर्षी पेसा दिवस म्हणून साजरा केला जातो. त्या अनुषंगाने समन्वयक गाव गणराज्य शिलालेख व गोंडवाना सांस्कृतिक महोत्सव कामतळा व ग्रामसभा मोहगावच्या संयुक्त विद्यमाने कामतळा येथे २४ ते २६ डिसेंबर दरम्यान आदिवासी संस्कृती महोत्सव मोठ्या उत्साहात घेण्यात आला. या कार्यक्रमात विविध सांस्कृतिक कार्यक्रमातून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. शिवाय गटचर्चेच्या माध्यमातून पेसा क्षेत्राच्या विकासाबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार हिरामण वरखडे होते. प्रमुख अतिथी म्हणून जि.प. सदस्य अ‍ॅड. लालसू नोगोटी, श्रीनिवास दुल्लमवार, तसेच भरत येरमे, भागराय उसेंडी, प्रा. महेश पानसे, गोंडीधर्म प्रचारक गणेश हलामी, गोविंदसहाय वाल्को सुनील बोडके आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी आदिवासी देवदेवतांची पारंपारिक पुजा सर्व भुम्यांच्या मार्फत करण्यात आली. शिलालेखाचे उद्घाटन गावभुम्या लालसाय गावडे यांच्या हस्ते तर ध्वजारोहण झुरूजी गावडे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी आदिवासींची परंपरा, संस्कृती, वेशभूषा, जीवनशैली, कलाकुसर, पारंपारिक वाद्य, वना आधारीत आहार व वनोपज, कंदमुळे, वन औषधी, पारंपारिक सेंद्रीय शेती व दैनंदिन साहित्याची माहिती देणारी प्रदर्शनी लावण्यात आली.
याप्रसंगी हिरामन वरखडे यांनी शासनाकडून मिळालेल्या मालकी हक्काचा वापर करून आदिवासी बांधवांनी आपल्या गावाचा विकास साधावा, असे अवाहन केले. याप्रसंगी कृषी सहायक दिनेश पानसे व वैद्यकीय अधिकारी डॉ. जाधव यांचा शाल व स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमात जि.प. सदस्य अ‍ॅड. लालसू नोगोटी यांच्या अध्यक्षतेखाली गटचर्चेचा कार्यक्रम घेण्यात आला. ग्रामसभांचा विकास आराखडा तयार करण्याबाबतचे आवाहन यातून करण्यात आले. यावेळी जि.प. सदस्य श्रीनिवास दुलमवार, आत्माचे प्रकल्प संचालक डॉ. प्रकाश पवार, तालुका कृषी अधिकारी निलकंठ बडवाई, जयंत टेंभुर्णे आदी उपस्थित होते.
सदर महोत्सवादरम्यान पारंपारिक वाद्याच्या निनादात, स्थानिक वेशभुषेत व आदिवासी नृत्याच्या तालावर फेरी काढण्यात आली. रात्रीच्या सुमारास नृत्य, कला, नकला, गीत व सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कार्यक्रम घेण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महोत्सव समन्वयक बावसू पावे, संचालन मानिक हिचामी यांनी केले.
यशस्वीतेसाठी २० गावांचे सर्व गावभुमे लालसाय गावडे, लालू आतला, सोमजी करंगामी, अलसू नरोटे, दसरू पोटावी, काशिराम नरोटे, दसरू हिचामी, राजू गावडे, माहू वाल्को तानू गावडे, देवराव गावडे, देवसाय आतला, बारसू दुगा आदीसह कामतळावासीयांनी सहकार्य केले.

महोत्सवाकडे पाठ फिरविणाऱ्या कर्मचाऱ्यांचा ग्रामसभेने केला निषेध
जि.प. सदस्य श्रीनिवास दुल्लमवार यांच्या अध्यक्षतेखाली सदर महोत्सवात विकास आराखडा नियोजन गटचर्चेचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी कृषी सहायक दिनेश पानसे, पेंढरी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जाधव, पेसा समन्वयक धुर्वे, वनरक्षक पी. एम. मगरे, ग्रामसेवक सय्यद यांनी उपस्थित राहून शासकीय योजनांची माहिती ग्रामसभांच्या पदाधिकाऱ्यांना दिली. मात्र सदर नियोजन सभेला बहुतांश शासकीय विभागाचे अधिकारी, कर्मचारी अनुपस्थितीत होते. त्यामुळे विकास आराखड्याचे काम रखडले. याबाबत संबंधित विभागाचा ग्रामसभांनी यावेळी जाहीर निषेध नोंदविला. विकासात अडसर ठरल्याच्या कारणावरून संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी ग्रामसभांनी यावेळी केली.

Web Title: At the time of the tribal cultural festival in Kamat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.