अवघड क्षेत्र ठरविताना दमछाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2017 12:40 AM2017-04-30T00:40:17+5:302017-04-30T00:40:17+5:30

जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्या करताना यावर्षी पहिल्यांदाच अवघड क्षेत्र व सर्वसाधारण क्षेत्र अशी जिल्ह्याची वर्गवारी करून ...

Tough to decide the difficult terrain | अवघड क्षेत्र ठरविताना दमछाक

अवघड क्षेत्र ठरविताना दमछाक

Next

अंतिम यादी ठरलीच नाही : शिक्षकांच्या बदल्यांसाठी शासनाचे नवे धोरण
दिगांबर जवादे गडचिरोली
जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्या करताना यावर्षी पहिल्यांदाच अवघड क्षेत्र व सर्वसाधारण क्षेत्र अशी जिल्ह्याची वर्गवारी करून त्यानुसार शिक्षकांच्या बदल्या करण्याचे निर्देश ग्राम विकास विभागाने जिल्हा परिषदेला दिले आहेत. मात्र अवघड व सर्वसाधारण क्षेत्र ठरविताना प्रशासनाची चांगलीच दमछाक उडाली असून एप्रिल महिना संपण्याच्या मार्गावर असतानाही अजुनही क्षेत्राचे विभाजन पूर्णपणे झाले नाही.
जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्या करताना दरवर्षी गोंधळ उडत होता. आॅनलाईन पध्दतीने बदल्या करण्याचे धोरण शिक्षण विभागाने मागील वर्षीपासून अवलंबिले असले तरी याही पध्दतीमध्ये गोंधळ उडत होता. आदिवासी बहुल, दुर्गम व नक्षलग्रस्त भागामध्ये शिक्षक जाण्यासाठी तयार होत नव्हते. शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना चिरीमिरी देऊन काही शिक्षक तालुकास्थळाच्या किंवा जिल्हास्थळाच्या सभोवताल आपल्या बदल्या करून घेत होते. या बदल्यांच्या माध्यमातून दरवर्षी कोट्यवधी रूपयांची उलाढाल होत होती. या पध्दतीमुळे दुर्गम भागात कार्यरत असलेल्या शिक्षकांवर मोठा अन्याय होत होता.
हा सर्व गोंधळ थांबविण्यासाठी ग्राम विकास विभागाने यावर्षी पहिल्यांदाच प्रत्येक जिल्ह्याचे अवघड क्षेत्र व सर्वसाधारण क्षेत्र या दोन भागात विभाजन करण्याचे व त्यानुसार शिक्षकांच्या बदल्या करण्याचे निर्देश दिले. या संदर्भात २७ फेब्रुवारी रोजी शासन निर्णय सुध्दा काढला आहे. जे क्षेत्र तालुका मुख्यालयापासून दूर आहे. दळणवळणाच्या दृष्टीने त्या शाळेत अथवा गावात पोहोचण्यास सोयीसुविधा उपलब्ध नाही. दुर्गम व डोंगराळ भागातील गावे तसेच काम करण्यास प्रतिकुल परिस्थिती असलेली गावे अवघड क्षेत्र म्हणून निश्चित करण्यात यावे. अवघड क्षेत्र निश्चितीची कार्यवाही करताना त्या जिल्ह्यातील मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्फतीने तालुक्यातील सर्वसाधारण तसेच भौगोलिक क्षेत्राचा विचार करून निर्णय घेण्याचे निर्देश दिले. अवघड क्षेत्रात न मोडणारी गावे सर्व साधारण क्षेत्रात मोडणार आहेत.
गडचिरोली जिल्ह्यात १५५३ गावांमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत. गडचिरोली जिल्ह्याचा ८० टक्के भूभाग घनदाट जंगलाने व्यापला आहे. जवळपास ३० टक्के गावांना जाण्यासाठी रस्तेच नाही. तर ५० टक्के गावे तालुका मुख्यालयापासून २० ते ३० किमी अंतरावर आहेत. त्यामुळे सर्वसाधारण क्षेत्रापेक्षा अवघड क्षेत्रातीलच गाव अधिक आहेत. अवघड व सर्वसाधारणमध्ये गावांची वर्गवारी करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी राज्य परिवहन, आरोग्य, पोलीस विभाग व संबंधित तालुक्याचे संवर्ग विकास अधिकारी या चार विभागाकडून अहवाल मागितला. मात्र प्रत्येक विभागाने वेगवेगळा अहवाल सादर केल्याने अवघड गाव ठरविणे जिल्हा परिषदेसाठीही अवघड झाले आहे. परिवहन विभागाचे बस त्या गावात जात नसेल तर परिवहन विभागाने त्या गावाला अवघड क्षेत्रात मोडले आहे. तर तेच गाव पोलीसच्या दृष्टीने सुरक्षित भागात मोडत असेल तर पोलीस विभागाने त्या गावाला सर्वसाधारण क्षेत्रात टाकले आहे. चारही विभागाचे गावांबाबतचे अहवाल वेगवेगळे आहेत. त्यामुळे कोणते गाव अवघड ठरवावे व कोणते गाव सर्वसाधारणमध्ये टाकावे, असा प्रश्न जिल्हा परिषद प्रशासनासमोर निर्माण झाला आहे.
मे महिन्यात शिक्षकांच्या बदल्या केल्या जातात. त्यामुळे एप्रिल महिन्यापूर्वीच क्षेत्राचे विभाजन होणे आवश्यक होते. मात्र एप्रिल महिना संपण्याच्या मार्गावर असतानाही अजूनपर्यंत हे क्षेत्रच ठरले नाही. सदर प्रकारचे क्षेत्र ठरविताना मागील दोन महिन्यांपासून शिक्षण विभाग कामाला लागला आहे. मात्र गावांची यादी तयार करण्याच्या प्रक्रियेपर्यंत तरी पोहोचता आले नाही. यादी तयार झाल्यानंतर शिक्षकांकडून आक्षेप मागविले जाणार आहेत. शिक्षकांकडून आक्षेपांचा आणखी पाऊस पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे झाल्यास या बाबीला आणखी विलंब होणार असल्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

दोन महिन्यांपासून खल सुरू
अवघड व सर्वसाधारण क्षेत्र ठरवून त्यानुसार २०१७ मधील शिक्षकांच्या बदल्या करण्याचे निर्देश शिक्षण विभागाने दिले. तेव्हापासून शिक्षण विभाग, आरोग्य, परिवहन विभाग, संवर्ग विकास अधिकारी व पोलीस विभाग यांच्याकडून माहिती मागविली आहे. याबाबीला आता दोन महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला आहे. मात्र अजूनपर्यंत माहितीबाबत एकमत झालेली नाही. दोन दिवसांपूर्वीच संवर्ग विकास अधिकारी यांची विशेष सभा बोलविण्यात आली होती. मात्र या सभेतही अंतिम चर्चा झाली नसल्याने गावे निश्चित झाली नाही.

शिक्षकांसाठी फायद्याचे
आजपर्यंत दुर्गम व नक्षलग्रस्त भागात कार्यरत असलेल्या शिक्षकांवर अन्याय होत होता. मात्र अवघड व सर्वसाधारण क्षेत्र ठरविल्यानंतर अवघड क्षेत्रातून काही वर्षानंतर सर्वसाधारण क्षेत्रात पोलीस विभागाप्रमाणेच बदली होण्याचा मार्ग यामुळे सुकर झाला आहे.

Web Title: Tough to decide the difficult terrain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.