गोंडवाना विद्यापीठाच्या पदव्युत्तर इतिहास विभागाच्या वतीने २५ जून राेजी इतिहास विषयाचे संशोधक विद्यार्थी व प्राध्यापकांच्या संशोधनाला योग्य दिशा मिळण्याकरिता क्रांतिवीर बाबूराव शेडमाके व्याख्यानमाला आयाेजित करण्यात आली. याअंतर्गत ‘भारतातील आदिवासी राजकारण वसाहत काळातील भिलीस्थानी चळवळीच्या विशेष संदर्भात’ या विषयावर डॉ. देवकुमार अहिरे यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष इतिहास विभागप्रमुख डॉ. रश्मी बंड यांनी भारतातील आदिवासी उठावाचा आढावा घेऊन स्वातंत्र्यलढ्यातील आंदोलनात आदिवासींच्या योगदानाविषयी सांगून वर्तमानकाळात आदिवासी इतिहासावर संशोधन होणे गरजेचे आहे, असेही त्या म्हणाल्या. कार्यक्रमाचे संचालन डॉ. नरेश मडावी तर आभार डॉ. प्रफुल नांदे यांनी मानले.
बाॅक्स
भिलीस्थान चळवळीचा उल्लेखच नाही
वसाहतवादी राजकारणाचा प्रतिरोध होत असताना काॅंग्रेसच्या आंदोलनात आदिवासींचा सहभाग दिसतो. मार्क्सवादी विचारांनीही आदिवासींचा वापर सावकार व जमीनदार यांच्या विरोधात लढणारी फोर्स म्हणून केला. भिल आदिवासींनी स्वतंत्र भिल राज्याकरिता भिलीस्थान चळवळीची सुरुवात केली होती. मात्र भिलीस्थान चळवळीचा उल्लेख इतिहासात दिसत नाही. १९४७च्या काळात भिलीस्थानची मागणी दाबण्यात आली, असे डॉ. देवकुमार अहिरे म्हणाले.