जंकासच्या सदस्यांना प्रशिक्षण
By Admin | Published: November 15, 2014 01:40 AM2014-11-15T01:40:21+5:302014-11-15T01:40:21+5:30
महाराष्ट्र राज्य सहकारी संघ पुणे यांच्या विद्यमाने सहकार प्रशिक्षण केंद्र चंद्रपूर, जिल्हा जंगल कामगार सहकारी संघ गडचिरोली ...
गडचिरोली : महाराष्ट्र राज्य सहकारी संघ पुणे यांच्या विद्यमाने सहकार प्रशिक्षण केंद्र चंद्रपूर, जिल्हा जंगल कामगार सहकारी संघ गडचिरोली यांच्यावतीने स्थानिक जिल्हा जंगल कामगार सहकारी संघाच्या कार्यालयात जिल्हा जंगल कामगार सहकारी संघाशी संलग्न संस्थांच्या सदस्यांना एक दिवशीय सहकार प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. या प्रशिक्षणात सदस्यांना जंकासच्या घटनादुरूस्तीबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा संघाचे उपाध्यक्ष पूर्णचंद्रराव राय सिडाम होते. प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्य जंगल कामगार सहकारी संघाचे संचालक घनश्याम मडावी, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक ईश्वर करंगामी, जिल्हा संघाचे संचालक सु. लु. उसेंडी, सचिव एम. झेड जांभुळकर, मार्गदर्श म्हणून सेवा निवृत्त सहाय्यक निबंधक, हरिष सहारे, प्राचार्य ठोंबरे उपस्थित होते.
सहारे यांनी सेवा सहकारी संस्थांच्या ९७ व्या घटना दुरूस्ती संदर्भात कायद्यात झालेल्या बदलाविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिव जांभुळकर तर आभार प्राचार्य ठोंबरे यांनी मानले. १२ नोव्हेंबर रोजी घोट येथील भाडभिडी संस्थेच्या कार्यालयात जिल्हा संघाचे अध्यक्ष माजी खासदार मारोतराव कोवासे यांच्या अध्यक्षतेखाली सदस्यांना प्रशिक्षण देण्यात आले. (प्रतिनिधी)