महिलांना सन्मानपूर्वक वागणूक द्या
By admin | Published: March 9, 2016 02:34 AM2016-03-09T02:34:12+5:302016-03-09T02:34:12+5:30
महाराष्ट्रासह भारतातील शेकडो महिलांनी विविध क्षेत्रात यश मिळवून उत्तुंग भरारी घेतली आहे.
पालिकेत महाआरोग्य शिबिर : अश्विनी धात्रक यांचे प्रतिपादन
गडचिरोली : महाराष्ट्रासह भारतातील शेकडो महिलांनी विविध क्षेत्रात यश मिळवून उत्तुंग भरारी घेतली आहे. असे असतानाही दुसरीकडे मात्र स्त्री भृणहत्या, महिलांवरील अन्याय व अत्याचार वाढत असून महिला व युवती १०० टक्के सुरक्षित नाही. महिलांच्या उत्थानासाठी पुरूषांनी आपली मानसिकता बदलविणे गरजेचे आहे. भ्रूणहत्येला कठोर विरोध करून महिलांचा सन्मान करा, असे प्रतिपादन गडचिरोली नगर परिषदेच्या अध्यक्ष डॉ. अश्विनी धात्रक यांनी केले.
राष्ट्रीय नागरी अभियानांतर्गत नगर परिषद व जिल्हा सामान्य रूग्णालय गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिलाचे दिनाचे औचित्य साधून मंगळवारी पालिकेच्या सभागृहात महाआरोग्य शिबिर घेण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या.
यावेळी मंचावर प्रमुख अतिथी म्हणून पालिकेचे उपाध्यक्ष प्रा. रमेश चौधरी, मुख्याधिकारी गिरीश बन्नोरे, वित्त व नियोजन सभापती बेबी चिचघरे, महिला व बाल कल्याण सभापती शारदा दामले, माजी पाणी पुरवठा सभापती संजय मेश्राम, रामकिरीत यादव, नगरसेविका सुषमा राऊत, पुष्पा कुमरे, लता मुरकुटे आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या, अनेकदा स्त्री ही स्त्रीची वैरी होत असल्याचे दिसून येते. यासाठी महिला व युवतींनी एकमेकांना सोबत घेऊन स्वत:सह कुटुंब व राज्याच्या विकासात योगदान द्यावे. पुरूषांचा विकास व यशामध्ये स्त्रीचे मोठे योगदान आहे. राजकीय क्षेत्रातही अनेक महिला सक्रीय असून त्यांनी विकासाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आहे. समाजात जेव्हा स्त्री-पुरूष समानता पूर्ण निर्माण होईल. तेव्हाच देशाचा संतुलित विकास होईल, असे डॉ. धात्रक यावेळी म्हणाल्या. प्रा. रमेश चौधरी यांनीही आपल्या भाषणातून स्त्रीच्या कार्याची महती सांगितली. पालिकेच्या माध्यमातून शहराचा विकास करण्यासाठी महिला नगरसेविकांचे मोठे योगदान लाभत आहे. जिल्हाभरातील महिलांनी राजकारण, समाजकारण या क्षेत्रासह विविध क्षेत्रात कार्यक्षम होऊन समाज विकासाला हातभार लावावा, असे त्यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याधिकारी गिरीष बन्नोरे यांनी केले तर संचालन व आभार न.प.चे कर्मचारी घोसे यांनी केले. कार्यक्रमाला जिल्हा सामान्य रूग्णालयाचे डॉक्टर, आरोग्य कर्मचाऱ्यांची चमू व गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. (स्थानिक प्रतिनिधी)