एटापल्ली तालुक्यातील बेरोजगार होणार ट्रक मालक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2019 12:54 AM2019-02-17T00:54:00+5:302019-02-17T00:55:32+5:30
एटापल्ली तालुक्यातील सुरजागड पहाडावरील लोहखनिजाची लोह प्रकल्पापर्यंत वाहतूक करण्यासाठी आता एटापल्ली तालुक्यातल्याच बेरोजगारांना ट्रक मालक होण्याची संधी मिळणार आहे. त्यासाठी अवघ्या ५० हजारांच्या नाममात्र गुंतवणुकीतून अनेक बेरोजगारांना चक्क ३३ लाखांच्या ट्रकचे मालक होण्याची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : एटापल्ली तालुक्यातील सुरजागड पहाडावरील लोहखनिजाची लोह प्रकल्पापर्यंत वाहतूक करण्यासाठी आता एटापल्ली तालुक्यातल्याच बेरोजगारांना ट्रक मालक होण्याची संधी मिळणार आहे. त्यासाठी अवघ्या ५० हजारांच्या नाममात्र गुंतवणुकीतून अनेक बेरोजगारांना चक्क ३३ लाखांच्या ट्रकचे मालक होण्याची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. यासाठी सरकारच्या स्टार्ट अप इंडिया या कार्यक्रमातून कर्जपुरवठा केला जाणार आहे. यातून ३०० ते ४०० बेरोजगारांना रोजगार-स्वयंरोजगार देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
लॉयड्स मेटल्स आणि राज्य सरकारच्या संयुक्त पुढाकाराने एटापल्ली तालुक्यातील अनुसूचित जमाती व जातीच्या १०० महात्वाकांक्षी तरुणांना ट्रक मालक बनविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
३३ लाखांच्या १४ चाकी ट्रकसाठी लॉयड्स मेटल्स प्रत्येकी २ लाख आणि राज्य सरकार २ लाख असे अर्थसहाय्य देणार आहे. याशिवाय मागास घटकांसाठी असलेल्या ‘डिक्की’ योजनेतून ४० टक्के सबसिडी दिली जाणार आहे. उर्वरित रक्कम बँक आॅफ इंडियाकडून कर्जस्वरूपात दिली जाईल. त्यासाठी गॅरंटीची जबाबदारी कंपनी घेणार आहे.
गेल्या महिन्यात झालेल्या लोहखाणीच्या ट्रक आणि बस अपघातात ४ लोकांचा बळी गेला होता. आतापर्यंत लोहखनिजाच्या वाहतुकीसाठी कंत्राटदाराकडून ट्रक लावले जात होते. चालकाच्या बेजबाबदार वाहतुकीवर नागरिकांचा रोष होता. आता स्थानिक युवकच ट्रकचे मालक आणि चालक होणार असल्यामुळे ते अधिक जबाबदारीने गाड्या चालवतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
मुख्यमंत्र्याच्या हस्ते शुभारंभ
विशेष म्हणजे या अनोख्या उपक्रमासाठी मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेतला असून सोमवारी काही बेरोजगार युवकांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ट्रकची चावी देऊन शुभारंभ होणार आहे. या ट्रकचा वापर घुग्गुस आणि पुढे कोनसरी येथे लोहखनिजाची वाहतूक करण्यासाठी होणार आहे. त्यासाठी मिळणाऱ्या भाड्यातून बँकेचा हप्ता भरला जाईल.