उत्पादन वाढीकरिता मधमाशी पालनाकडे वळा
By admin | Published: March 18, 2016 01:29 AM2016-03-18T01:29:32+5:302016-03-18T01:29:32+5:30
मधुमक्षिका पालनातून मध, मेण तसेच आयुर्वेदिक दृष्टीने अनेक महत्त्वाचे पदार्थ प्राप्त होत असतात.
तात्यासाहेब धानोरकर : कृषी महाविद्यालयात मधमाशी पालन जाणीव जागृती कार्यक्रम
गडचिरोली : मधुमक्षिका पालनातून मध, मेण तसेच आयुर्वेदिक दृष्टीने अनेक महत्त्वाचे पदार्थ प्राप्त होत असतात. शेतकऱ्यांना शेतीपूरक व्यवसायाला जोडधंदा म्हणून मधुमक्षिका पालन महत्त्वाचा व्यवसाय आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी उत्पादन वाढीकरिता मधुमक्षिका पालनाकडे वळावे, असे आवाहन भारतीय समाज प्रबोधन संस्था वरोराचे सचिव डॉ. तात्यासाहेब धानोरकर यांनी केले.
कृषी महाविद्यालय, कृषी विज्ञान केंद्र व कृषी संशोधन केंद्र गडचिरोली आणि भारतीय समाज प्रबोधन संस्था वरोरा तसेच केंद्रीय मधमाशी पालन संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मधमाशी पालन जाणीव जागृती कार्यक्रमाचे आयोजन कृषी विज्ञान केंद्रात बुधवारी करण्यात आले. यावेळी डॉ. धानोरकर बोलत होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन उपविभागीय कृषी अधिकारी एम. के. सोनटक्के यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. संदीप लांबे, डॉ. पुरूषोत्तम नेहरकर, डॉ. सुधीर बोरकर, डॉ. ब्राम्हणकर उपस्थित होते. शेतकऱ्यांनी जोडधंदा म्हणून मधमाशी पालनाची एक चळवळ निर्माण करणे गरजेचे आहे. मधमाशी पालनासाठी शासकीय योजना, प्रकल्प तयार करणे याबाबत मार्गदर्शन केले जाते, याचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन सोनटक्के यांनी केले.
डॉ. लांबे यांनी मधमाशी पालनाचे तंत्र सांगितले. मधमाशीचे वर्तन, मध गोळा करण्याची पद्धती, वसाहत नियोजन याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. डॉ. नेहरकर यांनी मधमाश्यांचे विविध प्रकार, पोळे, मधमाश्यांचा इतिहास याबाबत माहिती दिली. प्रास्ताविक डॉ. शुभांगी अलेक्झांडर, संचालन शुभम मेश्राम तर आभार डॉ. विजय काळपांडे यांनी मानले. धोंडगे, सरोदे, सातार, सरप, भोंगळे, राठोड, मुरतेली, गेडाम, कावळे यांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)