शेतकऱ्यांच्या खात्यात दोन कोटींचा बोनस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 09:59 PM2018-07-22T21:59:05+5:302018-07-22T21:59:49+5:30
आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांमार्फत धान खरेदी केली जाते. आविका संस्थांच्या केंद्रांवर धानाची विक्री केलेल्या एकूण ३ हजार ७३८ शेतकऱ्यांना प्रती क्विंटल २०० रूपये प्रमाणे आतापर्यंत एकूण २ कोटी ९ लाख ६७ हजार ३४० रूपयांचा बोनस........
दिलीप दहेलकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांमार्फत धान खरेदी केली जाते. आविका संस्थांच्या केंद्रांवर धानाची विक्री केलेल्या एकूण ३ हजार ७३८ शेतकऱ्यांना प्रती क्विंटल २०० रूपये प्रमाणे आतापर्यंत एकूण २ कोटी ९ लाख ६७ हजार ३४० रूपयांचा बोनस वितरित करण्यात आला आहे.
आदिवासी विकास विभागाच्या गडचिरोली प्रादेशिक कार्यालयांतर्गत ३ हजार ५० शेतकऱ्यांना १ कोटी ७४ लाख ६० हजार १८० रूपये बोनसच्या स्वरूपात अदा करण्यात आल्या आहे. या शेतकऱ्यांचे एकूण ८७ हजार ३०० क्विंटल धान बोनस देयकासाठी पात्र झाले आहेत. शासनाच्या नियमानुसार आदिवासी विकास महामंडळातर्फे खरीप हंगामात धानाची विक्री केलेल्या शेतकऱ्यांना ५० क्विंटल मर्यादेच्या आत २०० रूपये प्रती क्विंटल नुसार बोनस वितरित केला जातो. अहेरी कार्यालयाच्या वतीने ६८८ शेतकऱ्यांना ३५ लाख ७ हजार १६० रूपये बोनसच्या स्वरूपात आतापर्यंत अदा करण्यात आले आहे. गडचिरोली प्रादेशिक कार्यालयांतर्गत सन २०१७-१८ च्या खरीप हंगामात ३ लाख ६८ हजार ६१० व रबी हंगामात ४० हजार ८०९ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली. अहेरी कार्यालयांतर्गत असलेल्या केंद्रांवरून खरीप हंगामात १ लाख ३८ हजार २६ क्विंटल तर रबी हंगामात ३६ हजार ३४७ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली. गडचिरोली व अहेरी दोन्ही कार्यालयातील मिळून जवळपास ९० वर केंद्रावर एकूण २२ हजार ३५६ शेतकऱ्यांनी ५ लाख ८३ हजार ७९३ क्विंटल धानाची विक्री केली.
खरीप व रबी हंगामात धान विक्री केलेल्या सर्व शेतकऱ्यांना अहेरी कार्यालयामार्फत धान चुकाऱ्याची रक्कम अदा करण्यात आली आहे. गडचिरोली कार्यालयामार्फत दोन शेतकरी वगळता इतर सर्वाची धान चुकाऱ्यांची रक्कम थेट खात्यात जमा केली आहे. केवळ दोन शेतकऱ्यांची ७३ हजार इतकी धान चुकाऱ्याची रक्कम प्रलंबित आहे.
बँक खाते व आधार पडताळणीस गती
महामंडळाच्या कार्यालयामार्फत संपूर्ण जिल्हाभरात खरीप हंगामात धानाची विक्री केलेल्या शेतकऱ्यांना एकुण २ कोटी ९ लाख रूपयांचा बोनस वितरित करण्यात आला आहे. उर्वरित शेतकऱ्यांचे बँक खाते व आधार क्रमांकाच्या पडताळणीची कार्यवाही गतीने सुरू आहे. जिल्हाभरात सर्व संस्थांमार्फत ५० क्विंटल मर्यादेच्या आत धानाची विक्री केलेल्या शेतकऱ्यांची यादी त्यांचे आधार व बँक खाते क्रमांक महामंडळाच्या कार्यालयाने मागितले आहेत. काही संस्थांकडून बोनससाठीची शेतकऱ्यांची यादी विलंबाने प्राप्त झाली. त्यामुळे काही शेतकऱ्यांना बोनस देणे शिल्लक आहे.