आंतरराज्यीय तस्करी : गुप्तधन शोधण्यासाठी केला जात होता मांजराचा वापर, तपासात झाले निष्पन्नआसरअल्ली : छत्तीसगड राज्यातून खवल्या मांजराची गुप्त धनाच्या शोधासाठी तेलंगणा राज्यातील खंबम येथे तस्करी करताना सिरोंचा पोलीस व वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी एका टोळीतील तिघांना शनिवारी जेरबंद केले होते. त्यानंतर आता आणखी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. खवल्या मांजराचा गुप्तधन शोधण्यासाठी ही टोळी वापर करीत होती. ही बाब तपासात स्पष्ट झाली आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६ वरून छत्तीसगड राज्यातून तेलंगणा राज्याच्या खंबमकडे सिरोंचा येथून नदी पार करून जात असताना सिरोंचा पोलीस व वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी समय्या चंद्रय्या गोटा (३२) रा. तिमेड, बकय्या सुबय्या जव्वा (२०) रा. संड्रापल्ली ता. भोपालपट्नम जि. बिजापूर (छत्तीसगड) व प्रफुल प्रयुक्त दास रा. आसरअल्ली यांना शनिवारी अटक केली होती. त्यांना ५ आॅगस्टपर्यंत वनकोठडी सुनावण्यात आली. यातील मुख्य आरोपी आसरअल्ली येथील खासगी डॉक्टर प्रफुल दास यालाही अटक झाली. डॉक्टरच्या सांगण्यानुसार खवल्या मांजराचा उपयोग गुप्तधन शोधण्याच्या कामी करण्यात येत होता. तेलंगणामधील खंबम येथे एका महाराजाकडे (साधू) नेण्यात येत होते. डॉक्टर हा आसरअल्ली येथे दवाखान्यात उपचार करण्यासोबतच गुप्तधन शोधण्याचे कामही अधिक प्रमाणात करीत होता. यासाठी गावागावात फिरून माहिती काढत होता, अशीही माहिती आता पुढे आली आहे. डॉक्टरच्या सांगण्यावरून या प्रकरणात आणखी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यातील एक आरोपी भोपालपटनम (छत्तीसगड) मधून तर दुसरा आसरअल्ली नजीकच्या नलिकुडा गावातून अटक करण्यात आला आहे. दोन नव्या आरोपींमध्ये विनोद लक्ष्मण गंट्टा (३०) रा. नलिकुडा व बानय्या समय्या कुमरी (४५) (शिक्षक) रा. भोपालपटनम यांचा समावेश आहे. या प्रकरणाचा तपास सिरोंचाचे वनसंरक्षक प्रभूदास शुक्ला, उपवनसंरक्षक बेलेकर, वनपरिक्षेत्र अधिकारी एस. डी. करपे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे. (वार्ताहर)
खवल्या मांजर तस्करीप्रकरणात आणखी दोघांना अटक
By admin | Published: August 05, 2015 1:39 AM