सध्या लग्नसराई सुरू आहे पण नातेवाहिकांच्या विवाह सोहळ्यास उपस्थिती दर्शविण्यासाठी वाहतूक व्यवस्था नाही. अशा अवस्थेत दुचाकी वाहनांचा मोठा आधार मिळत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात दिवसभर दुचाकी वाहने फिरताना दिसून येत आहेत.
गतवर्षी मार्च २०२० मध्ये कोरोनामुळे अनेकांना ये-जा करण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली होती त्यामुळे बरेच शेतकरी व सर्वसाधारण कुटुंबातील व्यक्तींनी दुचाकी वाहन खरेदी केले. गतवर्षी ज्यांनी वाहन खरेदी केले त्यांना यावर्षी वाहतूक सुविधा उपलब्ध झाली आहे. मात्र, दुचाकी वाहन नसलेल्यांना दुचाकी असणाऱ्याची मनधरणी करावी लागत आहे तर काहीजण पायदळ जाऊन विवाह सोहळ्यास उपस्थिती दर्शवत आहेत. सध्या कोरोना संकट सुरू असून दैनंदिन वाहतुकीचे कोणतेही साधन ग्रामीण भागात नाही त्यामुळे केवळ दुचाकी एकमात्र वाहतुकीचे साधन ठरले आहे. दुचाकी वाहन खरेदी करण्याची कुवत नसलेले लाेक सायकलचा आधार घेत आहेत. त्यामुळे सध्या सायकलींनाही गतवैभव प्राप्त होऊ लागले आहे.