ग्रामसभांचे अभूतपूर्व मोर्चे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2018 11:42 PM2018-12-12T23:42:48+5:302018-12-12T23:44:48+5:30
जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या खाणींना दिलेली लिज रद्द करण्यात यावी, जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करण्यात यावा आदीसह विविध प्रकारच्या ५७ मागण्यांकडे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी महाग्रामसभांच्यावतीने बुधवारी चार ठिकाणी अभूतपूर्व मोर्चे काढण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या खाणींना दिलेली लिज रद्द करण्यात यावी, जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करण्यात यावा आदीसह विविध प्रकारच्या ५७ मागण्यांकडे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी महाग्रामसभांच्यावतीने बुधवारी चार ठिकाणी अभूतपूर्व मोर्चे काढण्यात आले. त्यात एटापल्ली येथील मोर्चा सर्वाधिक मोठा होता. या मोर्चांमध्ये ग्रामसभांचे पदाधिकारी, सदस्य व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन सर्वांचे लक्ष वेधून घेतले. विशेष म्हणजे चारही ठिकाणचे मोर्चे शांततेत आणि संयमी वातावरणात झाले.
एटापल्ली- येथील वन तपासणी नाक्यापासून दोन किमी अंतर पायी चालत मुख्य मार्गाने येऊन ग्रामसभांचे पदाधिकारी, सदस्य व ग्रामस्थ दुपारी २ वाजता आदिवासी मुलांच्या वसतिगृहाच्या पटांगणावर जमा झाले. त्यांना ग्रामसभेच्या पदाधिकाऱ्यांनी तब्बल २ तास मार्गदर्शन केले. या मोर्चात सूरजागड, तोडसा, वेनहारा, पुसुगड परिसरातील सर्व ग्रामसभांचे सदस्य व नागरिक तसेच विविध पक्षांचे पदाधिकारी, प्रत्येक गावातील पोलीस पाटील, सरपंच, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक यांच्यासह ७ हजारावर जनसमुदाय सहभागी झाला होता. एटापल्ली तालुक्यात पहिल्यांदाच अशा प्रकारचा भव्य मोर्चा निघाल्याची चर्चा नागरिकांमध्ये होती.
सुरजागड पहाडावरील लोहखाणीमुळे वनसंपत्तीची हाणी होत असल्याने त्याची लिज रद्द करावी, अतिक्रमणधारक शेतकºयांना वनजमिनीचे पट्टे सातबारासह देण्यात यावे, जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांची मागणील पाच वर्षांपासूनची भारत सरकारची शिष्यवृत्ती अदा करण्यात यावी, वर्ग ३ व ४ च्या स्थानिकांना त्या-त्या प्रवर्गातील आरक्षणानुसार देण्यात यावे, युपीएससी व एमपीएससीचे प्रशिक्षण केंद्र तसेच परीक्षा केंद्र उपलब्ध करून द्यावे, गरीब आदिवासी बांधवांवर लागू असलेले ११० गुन्हे माफ करून त्यांचे खटले बंद करावे, रोहयोमध्ये ग्रामसभांना यंत्रणा म्हणून मान्यता देण्यात यावी, नवीन तलाठी साजाची निर्मिती करावी, गोंडी बाभाषाच्या शाळा सुरू कराव्यात, प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी १०० खाटांचा दवाखाना तज्ज्ञ डॉक्टरांसह देण्यात यावा, शासकीय आश्रमशाळेत वरिष्ठ महाविद्यालयाचे वर्ग सुरू करावे, रेकणार येथील नागरिकाच्या हत्याप्रकरणाची चौकशी करून न्याय देण्यात यावा, कायद्यानुसार गैरआदिवासींनी आदिवासींच्या घेतलेल्या जमिनी पुन्हा आदिवासींना परत कराव्या, आदीसह ३८ मागण्यांचे निवेदन यावेळी देण्यात आले. त्यात मागण्यांवर विचार न केल्यास निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशाराही देण्यात आला. तहसील कार्यालयासमोरील मुलांच्या वसतिगृहाच्या प्रांगणात जमा झालेल्या मोर्चेकºयांसमोर येऊन एटापल्लीचे तहसीलदार ए.एस.थेटे यांनी निवेदन स्वीकारले. मोर्चादरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली एटापल्लीचे ठाणेदार सचिन जगताप यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
या मोर्चात जि.प.सदस्य सैनू गोटा, पं.स.उपसभापती नितेश नरोटे, नंदू मट्टामी, पं.स.सदस्य शीला गोटा, पुरसलगोंदीच्या सरपंच कल्पना आलाम, मंगेश आलामी, रामा तलांडे, रामा तुमरेटी, सुधाकर गोटा, लक्ष्मण नवळी, डोलेश मडावी, जारावंडीचे सरपंच रमेश दुग्गा, मंगेश नरोटे, राजू गोमाडी, सैनू महा, उलगे तिम्मा, जि.प.सदस्य संजय चरडुके, पं.स.सभापती बेबी लेकामी आदीसह शेकडो नागरिक सहभागी झाले होते.
कोरची- शेतकरी, शेतमजुरांच्या मागण्यांसह ओबीसींचे आरक्षण पूर्ववत करण्याच्या मागणीसाठी तालुक्यातील ग्रामसभांनी येथील तहसील कार्यालयावर मोर्चा काढून शासनाचे लक्ष वेधले.
दोन महिन्यात मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा यावेळी नागरिकांनी दिला. यावेळी हरिराम बागडेहेरिया, चमारू कल्लो, राजाराम नैताम, धनसिंग कल्लो, हरिराम कोल्हे, जयलाल कोडापे, रामू होळी, तानुराम पोरेटी, गोविंद सिंह होळी, बिरजु कमरो, छायाबाई उईके, मानबाई कुमरे, रेखाताई बोगा, पंजाबराव उईके, मीना हिळको, वनिता कुमरे, कचरीबाई काटेंगे, इंदल नैताम, गुलाब नैताम प्रतापगड, मनिराम परचो अडजाल, सुलतानाबाई पुडो यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते.
धानोरा - धानोरा तालुक्यातील सर्व ग्रामसभा व तालुका ग्रामसभा महासंघाच्या वतीने येथील मॉ दंतेश्वरी मंदिरापासून ते शहराच्या मुख्य मार्गाने मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला. मोर्चादरम्यान घोषवाक्य व नारे देण्यात आले. जनतेच्या हक्काच्या मागण्यांची पूर्तता शासनाने करून द्यावी, तालुक्यातील शेतकºयांचे प्रश्न, शेतमजुराचे प्रश्न, विद्यार्थी व बेरोजगारांच्या प्रश्नांवर एकत्र येत ग्रामसभाच्या सदस्यांनी हा मोर्चा काढला. तहसीलदारांमार्फत विविध मागण्यांचे निवेदन राज्यपाल, मुख्यमंत्री यांना पाठविण्यात आले. यात धानोरा तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्यात यावा, ब्रिटिशकालीन सदोष पीक आणेवारीची पद्धत बदलून सुधारित पद्धत लागू करावी, शेतकºयांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी, सिंचन सुविधा करण्यात यावी, धान खरेदी केंद्र सुरू करण्यात यावे, वनहक्क पट्टे देण्यात यावे, प्रत्येक गावाचा विकास निधी थेट ग्रामसभेच्या खात्यात जमा करावा. धानोरामध्ये १०० खाटांचे रुग्णालय करण्यात यावे, आदींसह एकूण ४४ मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.
याप्रसंगी समाजसेवक देवाजी तोफा, प्रकाश महाराज काटेंगे, दौलतशहा मडावी, माजी आ.डॉ.नामदेव उसेंडी, जि.प.सदस्य मनोहर पोरेटी, लता पुंगाटे, चंदू किरंगे, माणिकशहा मडावी, परशुराम पदा, ईश्वर कुमरे, माधव गोटा, सोपानदेव म्हशाखेत्री, साईनाथ साळवे, केशवशहा सयाम, बाजीराव उसेंडी, जमीर कुरेशी, विनोद लेनगुरे, गजानन काटेंगे, बागराय उसेंडी, देवराव नरोटे, बाजीराव नरोटे, मादगू कावडे, शिवराम उसेंडी, कपील कोवा, कृष्णा भुरकुरिया, प्रफुल किरंगे, बाजीराम कुमोटी, नामदेव नरोटे यांच्यासह शेकडो नागरिक सहभागी झाले होते.
भामरागड - भामरागड पट्टीतील ग्रामसभा व पारंपरिक गोटूल समिती तसेच सर्व जनतेच्या वतीने येथील तहसील कार्यालयावर विशाल मोर्चा काढण्यात आला. येथील अगरबत्ती प्रकल्प हेमलकसा ते तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये प्रामुख्याने जि.प.सदस्य अॅड.लालसू नोगोटी, पं.स.सभापती सुखराम मडावी, उपसभापती प्रेमिला कुड्यामी, रमेश पुंगाटी, लक्ष्मीकांत बोगामी, गोई कोडापे यांच्यासह ग्रामसभांचे अध्यक्ष, सचिव व सदस्य उपस्थित होते. पारंपरिक गोटूल समिती व ग्रामसभाच्या वतीने भामरागडचे तहसीलदार कैलास अंडिल यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
या मोर्चात भामरागड तालुक्याच्या विविध गावातून जवळपास दीड हजार लोक सहभागी झाले होते. उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार सुरेश मदने यांनी पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
विशेष म्हणजे या चारही ठिकाणच्या मोर्चांमध्ये विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, काही सामाजिक कार्यकर्तेही सहभागी झाले होते. उपविभागीय अधिकारी तहसीलदारांशी ग्रामसभांच्या शिष्टमंडळाने चर्चाही केली.
कोरचीसह चारही ठिकाणच्या मोर्चातील प्रमुख मागण्या
कोरची तालुका दुष्काळग्रस्त घोषित करुन आपदस्त शेतकºयांना हेक्टरी ५० हजार रुपये आर्थिक मदत द्यावी, पीक विम्याची रक्कम देण्यात यावी, शेतकऱ्यांना कर्जमुक्त करून सातबारा कोरा करण्यात यावा, शासनाने गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसींचे आरक्षण पूर्ववत १९ टक्के करावे, शेतकऱ्यांसाठी असलेल्या स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी तत्काळ लागू कराव्या, शेतमालाला उत्पादन खर्चापेक्षा दीडपट जास्त हमीभाव देण्यात यावा, नक्षल सप्ताहात आदिवासी बांधवांना विनाकारण पोलीस ठाण्यात बोलावून आठवडाभर ठेवले जाते, हा प्रकार त्वरित बंद करावा, आदिवासींवर लावण्यात येणारी ११० कलम रद्द करण्यात यावी, कोरची तालुक्यात जलसिंचनासाठी मोठे धरण नसल्याने शिवनाथ नदी व बेतकाटी-भिंमपूर नाल्यावरती उपसा सिंचन योजना सुरु करावी, तालुक्यातील सर्व रस्ते खड्डेमुक्त करण्यात यावे, कोटगुल येथे ते ३० केव्हीचे काम तत्काळ सुरू करण्यात यावे, टिपागड पर्यटन स्थळी शासनाने अभयारण्यासाठी मंजूर केलेली योजना रद्द करण्यात यावी, कोरची तालुक्यातील आगरी, मसेली, झेंडेपार, नांदेडी, भरीटोला येथील प्रस्तावित लोहप्रकल्प खाणी रद्द करण्यात याव्यात इत्यादी मागण्यांसाठी आजचा मोर्चा काढण्यात आला. सुमारे ५७ मागण्यांचे निवदेन तहसीलदार पुष्पलता कुमरे यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले.