रिक्तपदाने शिक्षण विभागाची पर्यवेक्षीय यंत्रणा पांगळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:28 AM2021-04-29T04:28:22+5:302021-04-29T04:28:22+5:30

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागामार्फत बाराही तालुक्यांत मिळून जवळपास १५५० प्राथमिक शाळा आहेत. या शाळांमध्ये पाच हजार शिक्षक कार्यरत ...

The vacancy has crippled the supervisory system of the education department | रिक्तपदाने शिक्षण विभागाची पर्यवेक्षीय यंत्रणा पांगळी

रिक्तपदाने शिक्षण विभागाची पर्यवेक्षीय यंत्रणा पांगळी

Next

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागामार्फत बाराही तालुक्यांत मिळून जवळपास १५५० प्राथमिक शाळा आहेत. या शाळांमध्ये पाच हजार शिक्षक कार्यरत आहेत. जिल्हास्तरावर जिल्हा परिषदेमध्ये शिक्षण विभाग असून या विभागामार्फत तालुक्यावर नियंत्रण ठेवले जाते. मात्र ग्रामीण, दुर्गम, अतिदुर्गम भागांतील शाळा, तेथील मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी गुणवत्ता यांसह विविध शैक्षणिक बाबींवर तालुक्याची पर्यवेक्षीय यंत्रणा नियंत्रण ठेवत असते. सदर पर्यवेक्षीय यंत्रणेमध्ये गटशिक्षणाधिकारी, शिक्षणविस्तार अधिकारी व केंद्रप्रमुख, आदींचा समावेश आहे.

विशेष म्हणजे अहेरी उपविभागात गटशिक्षणाधिकारी, शिक्षणविस्तार अधिकारी व केंद्रप्रमुखांची अधिकाधिक पदे रिक्त असल्याने या भागातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांच्या दर्जा व गुणवत्तेवर परिणाम होत आहे. गडचिरोली, धानोरा, भामरागड या तीनच पंचायत समिती स्तरांवर नियमित गटशिक्षणाधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. इतर नऊ तालुक्यांतील गटशिक्षणाधिकाऱ्यांची जबाबदारी प्रभारी अधिकाऱ्यांच्या खांद्यावर सोपविण्यात आली आहे. विशेषकरून अहेरी उपविभाग व उत्तर भागातील कोरची, कुरखेडा येथील पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी पदाचा प्रभार शिक्षणविस्तार अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आला आहे. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून गटशिक्षणाधिकारी पदाचा हा अनुशेष कायम आहे.

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाअंतर्गत १२ तालुके मिळून शिक्षणविस्तार अधिकाऱ्यांची एकूण ३१ पदे मंजूर आहेत. यांपैकी १८ पदे भरण्यात आली असून १३ पदे रिक्त आहेत. रिक्त पदांमध्ये धानोरा, एटापल्ली, गडचिरोली येथील प्रत्येकी एक, आरमोरी तालुक्यात दोन, चार्माेशी दोन, अहेरी दोन व सिरोंचा तालुक्यातील चार पदांचा समावेश आहे. केंद्रप्रमुखांची पदे रिक्त असल्याने या पदांचा प्रभार ज्येष्ठ शिक्षक तसेच मुख्याध्यापकांकडे सोपविला जात असतो.

बाॅक्स .......

केंद्रप्रमुखांची ४० वर पदे रिक्त

बाराही पंचायत समित्या मिळून जिल्ह्यात केंद्रप्रमुखांची एकूण १०१ पदे मंजूर आहेत. यांपैकी ५६ पदे भरण्यात आली असून ४५ पदे रिक्त आहेत. रिक्त पदांमध्ये सर्वाधिक अहेरी व सिरोंचा तालुक्यांतील पदांचा समावेश आहे. चार्मोशी तालुक्यात आष्टी, गणपूर; गडचिरोली तालुक्यात मुरखळा, येवली, आंबेशिवणी; आरमोरी तालुक्यात डोंगरगाव, मोहझरी, आरमोरी; मुलचेरा तालुक्यात गांधीनगर, मुलचेरा, सुंदरनगर; कुरखेडा तालुक्यात कढोली, कोरची तालुक्यात देऊळभट्टी, बेतकाठी व कोरची तसेच धानोरा तालुक्यात येरकड, दुर्गापूर, मुरुमगाव, पेंढरी, एटापल्ली तालुक्यात गट्टा, कसनसूर, गेदा, कोटमी, एटापल्ली आणि भामरागड तालुक्यात लाहेरी, मन्नेराजाराम, भामरागड व नारगुंडा, आदी ठिकाणची केंद्रप्रमुखांची पदे रिक्त आहेत.

बाॅक्स ......

दुर्गम भागातील शाळांबाबत उदासीनता

अहेरी तालुक्यात अहेरी, देवलमरी, आलापल्ली, राजाराम, उमानूर, जिमलगट्टा, देचलीपेठा, पेरमिली, दामरंचा, आदी नऊ ठिकाणची केंद्रप्रमुखांची पदे गेल्या अनेक महिन्यांपासून रिक्त आहेत. तसेच सिरोंचा तालुक्यात सिरोंचा, आरडा, झिंगानूर, रंगय्यापल्ली, रेगुंठा, टेकडाताला, आसरअल्ली व नदीकुडा, आदी आठ ठिकाणांची केंद्रप्रमुखांची पदे रिक्त आहेत. स्वतंत्र केंद्रप्रमुख नसल्याने दुर्गम भागातील शाळांमधील सुविधा, तेथील गुणवत्ता व विकासाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. पर्यवेक्षीय यंत्रणा या उपविभागात पांगळी असल्याने दुर्गम भागातील शाळा रामभरोसे आहेत. परिणामी अहेरी उपविभागातील अनेक शाळांचे शिक्षक आठवड्यातून एक ते दोन दिवस शाळेला दांडी मारतात. मात्र तपासणीच्या अहवालात सर्व व्यवस्थित दाखविले जाते.

Web Title: The vacancy has crippled the supervisory system of the education department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.