राजोलीवासीयांनी अडविले खासदार व आमदारांचे वाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2018 11:35 PM2018-08-19T23:35:03+5:302018-08-19T23:36:11+5:30
कठाणी नदीवरील पूल अर्धवट असल्याने राजोलीवासीयांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो. ही बाब खासदारांच्या लक्षात आणून देण्यासाठी राजोलीवासीयांनी खासदार अशोक नेते, आमदार डॉ. देवराव होळी यांचे वाहन अडवून पुलाची पाहणी करण्याची मागणी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
धानोरा : कठाणी नदीवरील पूल अर्धवट असल्याने राजोलीवासीयांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो. ही बाब खासदारांच्या लक्षात आणून देण्यासाठी राजोलीवासीयांनी खासदार अशोक नेते, आमदार डॉ. देवराव होळी यांचे वाहन अडवून पुलाची पाहणी करण्याची मागणी केली. नागरिकांच्या मागण्यांना मान देत आमदार व खासदारांनी पुलाची पाहणी केली. या पुलाच्या पूर्ण बांधकामासाठी पाच कोटी रूपये उपलब्ध करून दिले जातील, असे आश्वासन दिले.
खासदार अशोक नेते व आमदार डॉ. देवराव होळी हे रविवारी धानोरा येथील भारतीय जनता पार्टीच्या मंडळ कार्यकर्ता प्रशिक्षणाला गेले होते. आमदार व खासदार आल्याची माहिती कळताच पंचायत समिती सदस्य महागू वाडगुरे, माजी सरपंच लाला गेडाम, ग्रामसभा सदस्य मनोहर गुरनुले यांच्या नेतृत्वात राजोलीवासीयांनी धानोरा गाठले. आमदार व खासदार यांना घेराव घालून पुलाच्या गंभीर स्थितीबाबत अवगत केले. प्रत्यक्ष पुलाची पाहणी केल्याशिवाय नागरिकांच्या समस्या लक्षात येणार नाही, ही बाब राजोलीवासीयांनी खासदारांना पटवून दिली. प्रत्यक्ष पुलाची पाहणी करण्याची मागणी केली.
त्याचबरोबर पूल बांधकामासाठी निधी देण्याबाबत निवेदनही सादर केले. खासदार व आमदारांनी प्रत्यक्ष नदीकाठी जाऊन पुलाची पाहणी केली. पूल अर्धवट असल्याने विद्यार्थी व नागरिक जीव धोक्यात घालून प्रवास करीत असल्याचे दिसून आले. समस्येची गंभीरता लक्षात घेऊन पुलाचे काम पूर्ण करण्यासाठी पाच कोटी रूपयांचा निधी देण्याचे आश्वासन दिले.
अशी आहे कठाणी नदीवरील पुलाची दयनीय स्थिती
धानोरा तालुकास्थळापासून ८ किमी अंतरावर असलेल्या राजोली येथील कठाणी नदीवर २०१५ साली बांधलेला पूल अर्धवट आहे. या पुलामुळे राजोलीवासीयांना धानोरा येथे जाण्यासाठी ५ किमीचे अंतर कमी झाले. अन्यथा नागरिकांना नवरगाव-सोडे मार्गे यावे लागत होते. कंत्राटदाराने पूल बांधताना तो अगदी नदीच्या काठापर्यंत बांधणे आवश्यक होते. मात्र काठापर्यंत पूल बांधला नाही. पुलाजवळील पिचिंग व्यवस्थित केली नाही. परिणामी काठाजवळील माती वाहून गेली. त्याचबरोबर दरवर्षी नदीकाठाचा विस्तार होत असल्याने पूल व नदीचे काठ यामध्ये जवळपास आता ५० फुटांचे अंतर पडले आहे. पूल व नदीची पातळी यामध्ये खड्डा निर्माण झाला आहे. पाऊस पडून नदीची पाणीपातळी वाढल्यानंतर ५० फुटाच्या अंतरात पाणी राहते. परिणामी या मार्गावरील वाहतूक बंद राहते. पूल ते नदीपात्र जवळपास १० फूट अंतर आहे. प्रशासनाने तीन फूट उंचीचे सिमेंट पाईप टाकले आहेत. त्यावर गावातील नागरिक दरवर्षी सिमेंटच्या बॅगमध्ये रेती भरून बॅग पाईपवर ठेवतात. अशा पद्धतीने पुलावरून उतरले जाते. मात्र दुचाकी किंवा चारचाकी नेणे अशक्य होते.