मार्र्कं डात उसळला जनसागर : अनेकांनी केली कालसर्प व नागबली नारायणाची पूजाचामोर्शी/मार्र्कंडादेव : विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मार्र्कंडादेव येथे वैनगंगेच्या तीरावर माघ अमावस्येचे औचित्य साधून लाखो भाविकांनी बुधवारी पवित्र शाही स्नान बीजेच्या निमित्ताने केले. यावेळी स्त्री व पुरूषांच्या लोंढ्यांनी वैनगंगेचे पात्र फुलून गेले होते. महाशिवरात्रीनंतर दोन दिवसांनी माघ अमावस्या आल्याने व याच दिवशी सूर्यग्रहणही असल्याने मार्र्कंडा येथे वैनगंगा नदीत स्नानासाठी हजारो भावीक आले होते. पूर्वीपासून चालत आलेल्या परंपरेप्रमाणे पूर्वजांच्या आत्म्याला शांती व मुक्ती मिळावी, याकरिता अनेकांनी वैनगंगेत स्नान करून केश दान केले. तसेच पिंडदानही करून नागबली नारायण व कालसर्पाची पूजा केली. त्यानंतर अभिषेक केला. यावेळी १० वर्षातून पहिल्यांदाच प्रथम महाशिवरात्री व त्यानंतरचा दिवस सोमवार आल्यामुळे पावनपुण्य प्राप्त करण्यासाठी आंघोळ करावी लागते, अशी भाविकांची श्रद्धा आहे व हे औचित्य साधून हजारो भाविकांनी पवित्र स्नान केले. पितृ माघ अमावस्या असल्याने पहाटेपासूनच वैनगंगेत स्नान करण्यासाठी भाविकांची प्रचंड गर्दी उसळली होती. यावेळी कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून यात्रा काळात तैनात असलेल्या आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेने चोख बंदोबस्त नदीपात्रात ठेवला होता. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेत पाच पट्टीचे पोहणारे इसम याशिवाय मार्र्कंडा यात्रेदरम्यान वैनगंगा नदीपात्रात भाविकांच्या सुरक्षिततेसाठी बोट, लायबाइ, लाईफ जॉकेट, अग्निशमन यंत्र मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून दिले आहे. ही सारी यंत्रणा या शाही स्नान सोहळ्याच्या वेळी सतर्क ठेवण्यात आली होती. १ किमी अंतरावर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्च लाईट मेगाफोन्सचीही व्यवस्था करण्यात आाली असून सीसीटीव्ही नियंत्रण कक्षाची व्यवस्था करण्यात आली आहे. महिलांसाठी प्रथमच स्नानगृह व नावाड्यांना जॉकेट, लायबाइची व्यवस्था करण्यात आली आहे, व्यवस्थेवर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी कृष्णा रेड्डी व चामोर्शीचे तहसीलदार यू. जी. वैद्य नजर ठेवून आहेत. पोलीस विभागाच्या वतीने ३५० पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच १५० गृहरक्षक सुरक्षाव्यवस्थेसाठी तैनात आहे. नियंत्रणाकरिता मार्र्कंडानगरीत नऊ पोलीस चौक्या उभारण्यात आल्या आहे. संपूर्ण यात्रेवर नियंत्रण ठेवण्यासाठी एक मुख्य नियंत्रण कक्षाची व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे. (शहर प्रतिनिधी)
बीजेनिमित्त भाविकांचे वैनगंगेत शाही स्नान
By admin | Published: March 10, 2016 2:04 AM