लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली: १३ व्या राज्य विधानसभेसाठी सोमवारी सुरू झालेल्या मतदानास गडचिरोली जिल्ह्यात कडेकोट बंदोबस्तात प्रारंभ झाला. नागरिकांनी सकाळपासूनच मतदान केंद्रांवर हजेरी लावल्याचे दिसून आले.भामरागड येथील १८५ क्रमांकाच्या मतदान केंद्रावर वस्ती-पाड्यांवरच्या आदिवासी बांधव व भगिनींनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. ही मंडळी दूरवरून पायी चालत येत असल्याने त्यांच्यासाठी मुलभूत सुविधा केंद्रांवर पुरविण्यात आल्या होत्या. पिण्याकरिता पाण्याचा साठाही विपुल प्रमाणावर उपलब्ध करून दिला गेला होता. दिव्यांग मतदार व ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्याने मतदानाकरिता पाठवले जात होते.पळसागड येथे सुरक्षा दलाच्या देखरेखीत मतदानाला प्रारंभ झाला. येथील सरपंच उमाजी धुर्वे यांनी रांगेत उभे राहून मतदानाचे कर्तव्य पार पाडले.गडचिरोली जिल्ह्यात असलेल्या संवेदनशील मतदान केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले होते. जागोजागी पोलिस व सुरक्षा दलांचे जवान तैनात करण्यात आले होते. मुलचेरा तालुक्यातही अतिशय कडेकोट बंदोबस्तात मतदानास सुरुवात झाली.
Maharashtra Election 2019; गडचिरोली जिल्ह्यात कडेकोट बंदोबस्तात मतदान सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2019 8:54 AM