११७० जागांसाठी आज मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:36 AM2021-01-20T04:36:16+5:302021-01-20T04:36:16+5:30
दुसऱ्या टप्प्यातील चामोर्शी, अहेरी, मूलचेरा, एटापल्ली, भामरागड आणि सिरोंचा या सहा तालुक्यातील १६२ ग्रामपंचायतींमध्ये १४५४ जागांसाठी ही निवडणूक होत ...
दुसऱ्या टप्प्यातील चामोर्शी, अहेरी, मूलचेरा, एटापल्ली, भामरागड आणि सिरोंचा या सहा तालुक्यातील १६२ ग्रामपंचायतींमध्ये १४५४ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. २३० जागांवर एकच उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात शिल्लक राहिल्यामुळे त्यांची अविरोध निवड झाली तर काही जागांसाठी कोणीही अर्ज केला नाही. त्यामुळे आता प्रत्यक्षात ११७० जागांसाठीच मतदान होणार आहे.
सहा तालुक्यातील एकूण दोन लाख ४९ हजार ८३८ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये एक लाख २१ हजार ९५५ महिला, तर एक लाख २७ हजार ७४१ पुरुष मतदार आहेत.
पहिल्या टप्प्यात कोणत्याही नक्षल अडथळ्याशिवाय मतदानप्रक्रिया पार पडली. दुसऱ्या टप्प्यातही कोणताही अडथळा येऊ नये म्हणून पोलीस यंत्रणा सज्ज असून, विविध सुरक्षा पथके तैनात करण्यात आली आहेत.
(बॉक्स)
२१६६ अधिकारी-कर्मचाऱ्यांची ड्यूटी
दुसऱ्या टप्प्यात एकूण ४८६ मतदान केंद्रे आहेत. त्यातील दीडशेपेक्षा जास्त मतदान केंद्र संवेदनशील आहेत. बेस कॅम्पवरून त्या केंद्रांवर जाण्यासाठी मंगळवारी कर्मचाऱ्यांना अनेक किलोमीटरची पायपीट करावी लागली. सर्व केंद्रांवर मिळून एकूण दोन हजार १६६ कर्मचारी व अधिकारी सेवा देत आहेत. बुधवारी मतदान आटोपल्यानंतर त्यांना पुन्हा पायपीट करत बेस कॅम्पवर यावे लागणार आहे.