दाेन वर्षांनंतर पुन्हा उतरले निसर्गाचे ‘सफाई कामगार’, पक्षीप्रेमींकडून निरीक्षण व देखरेख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2022 03:22 PM2022-04-20T15:22:23+5:302022-04-20T15:24:58+5:30

कुनघाडा रै. वनपरिक्षेत्रातील जोगना उपक्षेत्रातील कक्ष क्रमांक ४० कुथेगाव जंगल परिसरात ताडाच्या झाडावर १० ते १५ च्या संख्येने गिधाडे आढळून आली. यामुळे वनविभागासह पक्षीप्रेमींमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

vultures showed up after 2 years environment lover excited | दाेन वर्षांनंतर पुन्हा उतरले निसर्गाचे ‘सफाई कामगार’, पक्षीप्रेमींकडून निरीक्षण व देखरेख

दाेन वर्षांनंतर पुन्हा उतरले निसर्गाचे ‘सफाई कामगार’, पक्षीप्रेमींकडून निरीक्षण व देखरेख

Next

चामोर्शी (गडचिरोली) : पर्यावरण व अन्नसाखळीतील महत्त्वाचा घटक म्हणून ओळख असलेल्या गिधाडांचे अस्तित्व राज्याच्या काही भागातच शिल्लक आहे. गडचिराेली जिल्ह्यात मागील वर्षीच्या दिवाळीत गिधाडांचे दर्शन लाेकांना झाले हाेते. त्यानंतर गिधाड कुठे गेले, याबाबत पक्षीप्रेमींमध्ये उत्सुकता हाेती. त्यातच १६ एप्रिल राेजी कुनघाडा रै. वनपरिक्षेत्रातील जोगना उपक्षेत्रातील कक्ष क्रमांक ४० कुथेगाव जंगल परिसरात ताडाच्या झाडावर १० ते १५ च्या संख्येने गिधाडे आढळून आली. यामुळे वनविभागासह पक्षीप्रेमींमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

गिधाड हा निसर्गातील महत्त्वपूर्ण सजीव घटक आहे. अन्नसाखळीतील त्याचे स्थान अढळ आहे. गिधाड हा कधी शिकार करीत नाही. मृत जनावरांच्या मांसावर तो आपला उदरनिर्वाह चालवताे. गडचिरोली जिल्ह्यात साधारणत: तीन दशकांपूर्वी गिधाडाचे अस्तित्व गावागावांत दिसून येत होते. मात्र, झपाट्याने गिधाडांची संख्या कमी झाली. २०१० मध्ये नवेगाव रै. नियत क्षेत्रातील सराड, बोडी परिसरात विषबाधा झाल्याने जवळपास ४३ गिधाडे बेशुद्ध पडलेली आढळली हाेती. यात काही मृत झाली, तर काही उपचारानंतर बरी झाले. त्यामुळे गिधाड संरक्षणार्थ कुनघाडा रै. वनपरिक्षेत्राने दखल घेऊन येथे गिधाड संरक्षण केंद्र स्थापन करून नवेगाव, दर्शनी, मालेर माल, मारकबोडी, आदी ठिकाणी गिधाड उपाहारगृहाची निर्मिती केली व त्यांच्यावर देखभाल ठेवण्यासाठी गिधाड मित्रांची निवड करून गावागावांत जनजागृती केली. त्यामुळे कुनघाडा रै. क्षेत्रात गिधाडांचे अस्तित्व टिकून आहे. येथील गिधाड संवर्धनाची देशभरात दखल घेतली गेली. तमिळनाडू, पश्चिम बंगाल, कर्नाटक, मध्य प्रदेश येथील ३३ वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी गिधाड संवर्धनाचा अभ्यास दौरा केला हाेता.

केव्हा-केव्हा आढळले गिधाड?

२०१८ मध्ये मालेर माल येथे जवळपास २०० च्या संख्येने गिधाड पक्षी गिधाड मित्रांच्या निदर्शनास आले होते. १६ एप्रिल २०२२ रोजी गिधाड मित्र राहुल कापकर, सुभाष मेडपल्लीवार व नामदेव वासेकर हे कक्ष क्र. ४० कुथेगाव जंगल परिसरात गिधाड शोधार्थ मोहीम राबवीत असता ताडाच्या झाडावर १० ते १५ च्या संख्येने गिधाड आढळून आले. त्यामुळे कुनघाडा रै. वनपरिक्षेत्रात गिधाडांचे अस्तित्व कायम आहे, असे कुनघाडाचे वनपरिक्षेत्र अधिकारी महेशकुमार शिंदे यांनी सांगितले.

दिवसेंदिवस निर्माण हाेत असलेला अन्नाचा तुटवडा, निवासयोग्य झाडांचा अभाव, प्रतिकूल परिस्थिती, आदी कारणांमुळे गिधाडांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. पर्यावरण रोगमुक्त करून मानवी स्वास्थ्य टिकवून ठेवण्यासाठी गिधाड संरक्षण काळाची गरज आहे.

साेनल भडके, सहायक वनसंरक्षक गडचिराेली

Web Title: vultures showed up after 2 years environment lover excited

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.