वडसा-गडचिरोली रेल्वेमार्गाचा विषय पोहोचला लोकसभेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2020 06:00 AM2020-03-05T06:00:00+5:302020-03-05T06:00:36+5:30
वडसा-गडचिरोली या नवीन रेल्वेमार्गाला मंजुरी प्रदान करून दोन वर्ष झाली असताना जमीन अधिग्रहण व मार्गाच्या बांधकामासाठी निधीची पूर्तता करण्यात न आल्याने या रेल्वेमार्गाचे काम रखडलेले आहे. त्यामुळे जमीन अधिग्रहणाची कार्यवाही पूर्ण करून व निधीची पूर्तता करून सदर मार्गाचे काम तात्काळ सुरू करण्याची मागणी खासदार नेते यांनी लोकसभेत केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : दुर्गम व जंगलव्याप्त, आदिवासीबहुल, नक्षलप्रभावित आणि अविकसित क्षेत्र असलेल्या गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रातील नागरिकांसाठी रेल्वेप्रवासाचे स्वप्न दिवास्वप्नच ठरत आहे. या क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांनी अखेर बुधवारी (दि.४) नियम ३७७ च्या अधीन सूचनेअंतर्गत लोकसभेत या मुद्द्यावर आवाज उठवत हे काम तत्काळ सुरू करण्याची मागणी केली.
वडसा-गडचिरोली या नवीन रेल्वेमार्गाला मंजुरी प्रदान करून दोन वर्ष झाली असताना जमीन अधिग्रहण व मार्गाच्या बांधकामासाठी निधीची पूर्तता करण्यात न आल्याने या रेल्वेमार्गाचे काम रखडलेले आहे. त्यामुळे जमीन अधिग्रहणाची कार्यवाही पूर्ण करून व निधीची पूर्तता करून सदर मार्गाचे काम तात्काळ सुरू करण्याची मागणी खासदार नेते यांनी लोकसभेत केली.
यासोबतच गडचिरोली-चिमुर लोकसभा क्षेत्राला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी गडचिरोली-आष्टी-आलापल्ली- सिरोंचा- मंचेरीयाल- अदिलाबाद तथा नागभीड- काम्पाटेम्पा- चिमूर- वरोरा या दोन नवीन रेल्वेलाईनच्या सर्व्हेक्षणासाठी निधीची तरतूद करण्याची मागणीही नेते यांनी लोकसभेत करून या नवीन रेल्वे मार्गाच्या प्रश्नाकडे केंद्र शासनाचे लक्ष वेधले.