लाेकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मार्कंडादेव तीर्थस्थळाकडे जाणाऱ्या चामोर्शी बायपास मार्गावरील प्रवास चांगलाच खडतर झाला आहे. या मार्गाच्या दुरूस्तीचे काम मंजूर झाले आहे. पण हे काम लवकर सुरू करून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी होत आहे. चामोर्शी-मार्कंडादेव रस्त्यावर अनेक ठिकाणी डांबर उखडून त्यातील गिट्टी, मुरूम निघून खड्डे पडले आहेत. खड्ड्यात पावसाचे पाणी साचले असून या डांबरी मार्गाची पूर्ण वाट लागली आहे. या मार्गावर अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. मार्कंडादेव येथे विदर्भ व राज्याच्या विविध भागातून हजारो भाविक दर्शनासाठी दररोज भाविक येत असतात मात्र रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाल्याने वाहनधारक भाविकांना मार्कंडादेव तीर्थस्थळी पोहोचणे कठीण झाले आहे. या रस्त्याची नव्याने बांधणी करावी, अशी मागणी मार्कंडादेव येथील नागरिक व भाविकांनी केली आहे . चामोर्शी - मार्कंडादेव, चामोर्शी व्हाया शंकर हेटी तसेच फराडा व मार्कंडादेव, फोकुर्डी - मार्कडादेव, चाकलपेठ वळण व्हाया मार्कंडादेव मार्गाने दररोज भाविक येत असतात. कोरोना लॉकडाऊनमध्ये जड वाहनाच्या आवागमनाने या रस्त्याची पूर्णत वाट लागून खुड्डे पडून गिट्टी उखडली आहे. त्यामुळे रस्त्याची नव्याने बांधकाम करण्याची मागणी मार्कंडादेव येथील नागरिकांनी व भाविकांनी केली आहे . स्थानिक लाेकप्रतिनिधींचे याकडे दुर्लक्ष हाेत आहे.