देसाईगंज : विदर्भातील पावसाचे अल्प प्रमाण लक्षात घेता विदर्भ सघन सिंचन विकास कार्यक्रमाअंतर्गत नागपूर विभागातील नऊ जिल्ह्यांत या उपक्रमाची सुरुवात २०१३पासून करण्यात आली. या उपक्रमातून देसाईगंज तालुक्यातील अनेक ठिकाणी कोल्हापुरी बंधारे बांधण्यात आले. मात्र, देखभालीअभावी तालुक्यातील कोल्हापुरी बंधाऱ्यांची वाट लागली आहे. जलसिंचनाला बळकटी देणाऱ्या या उपक्रमाला अखेरची घरघर लागल्याचे चित्र देसाईगंज तालुक्यात दिसून येत आहे.
विदर्भात सिंचन क्षमता वाढावी, यासाठी जलसंधारण विभागाने सन २००३ ते २०१७ हा कृती आराखडा तयार केला होता. या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीची जबाबदारी विदर्भ सघन सिंचन विकास कार्यक्रम नागपूरअंतर्गत मुख्य अभियंता लघुसिंचन (जलसंधारण) मंडळ, नागपूर विभाग यांच्याकडे सोपविण्यात आली. या कार्यक्रमात जलसंधारण, मृद संधारण यासाठी कोट्यवधीचा निधी प्राप्त झाला. या निधीतून ० ते २५० हेक्टरपर्यंत सिंचन क्षमता निर्माण करणे, सिंचन क्षमता पुनर्स्थापित करणे, गाव तलाव, साठवण तलाव, लघु पाटबंधारे शिवकालीन तलाव, पाझर तलाव, कोल्हापुरी बंधारे व त्यातील सिंचन क्षमता पुनर्स्थापित करणे, मामा तलावाचे नूतनीकरण दुरुस्ती व खोलीकरण करणे आदी व यात पाणी वापर संस्थांची स्थापना करून सिंचनाचे नियोजन करणे आदी कामांचा समावेश हाेता.
कोरडवाहू शेतीची उत्पादकता वाढविणे, हा हेतू असाध्य होऊन काेटयवधी रुपये खर्च दाखवून बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यांचा तीळमात्र उपयोग आजच्या घडीस शेतकऱ्यांना होताना दिसत नाही. त्यामुळे शासनाच्या योजना प्रभावीपणे न राबविलेल्या बंधाऱ्यांच्या कामाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
(बॉक्स)
जलयुक्त शिवारचा फायदा काय?
- जिल्ह्यात सिंचनाच्या नावावर विविध योजना धुमधडाक्यात सुरू झाल्या. मात्र, तलाव खोलीकरणापासून तर बंधारे बांधकाम थातुरमातुर करण्यात आले. या योजनेअंतर्गत देसाईगंज तालुक्यात मोठ्या प्रमाणात कोल्हापुरी बंधारे बांधण्यात आले. परंतु शाश्वत शेतीला पाणी मिळून दुष्काळसदृश परिस्थितीत या पाण्याचा उपयोग शेतीला झालाच नाही.
- आज तालुक्यात एकही बंधारा सुस्थितीत नाही. जलशिवार योजनेच्या कामातही मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा शेतकऱ्यांचा आराेप आहे. पाणी अडविण्यासाठी बनविण्यात आलेल्या लोखंडी दरवाजापासून ते बंधाऱ्यांच्या भिंतीसुद्धा अल्पावधीतच निकामी होऊन त्या बंधाऱ्यांची पुरती वाट लागलेली आहे.
090921\1613img_20200719_171600.jpg
तालुक्यातील बंधारेच्या पावसाळ्यात सिंचनासाठी उपयोगात न येता अशा दुरावस्था.