लोकमत न्यूज नेटवर्कधानोरा : धानोरा या तालुका मुख्यालयापासून ४१ किमी अंतरावर असलेल्या कटेझरी ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या लहान झेलिया या गावाला जाण्यासाठी रस्ता नाही. त्यामुळे जंगलातून पायवाट तुडवत गाव गाठावे लागते. गावाला जातेवेळी दोन मोठमोठे नाले पडतात. पावसाळ्यात या नाल्यांमध्ये पाणी राहात असल्याने रहदारी पूर्णपणे ठप्प होते. अशा स्थितीत स्वातंत्र्याच्या ७२ वर्षानंतरही हे गाव खऱ्या स्वातंत्र्यापासून वंचितच आहे.हे गाव कटेझरीपासून पाच किमी अंतरावर आहे. मुरूमगाव-कटेझरीपर्यंत डांबरी रस्ता आहे. कटेझरीवरून मात्र या गावाला जाण्यासाठी रस्ताच नाही. या गावात एकूण १७ घरे आहेत. लोकसंख्या १२० च्या जवळपास आहे. गावात जिल्हा परिषदेची शाळा असून पहिली ते चौथ्या वर्गापर्यंत शिक्षणाची सोय आहे. गावाला जाण्यासाठी दोन मोठे नाले पडतात. नाल्यांवर पूलाचे बांधकाम झाले नाही. त्यामुळे पावसाळ्यात नाल्यातील पाणी पार करून गावकऱ्यांना जावे लागते. पक्का रस्ता नसल्याने चारचाकी तर जातच नाही. मोठ्या कठीण प्रसंगाचा सामना करीत दुचाकी गावापर्यंत पोहोचते. पावसाळ्याच्या दिवसात नाल्यात पाणी राहत असल्याने दुचाकीही जात नाही. गरोदर माता किंवा गंभीर स्थितीतील रुग्ण रस्त्याअभावी दगावण्याचा धोका आहे.जिल्हा परिषदेची शाळा आहे. परंतु या ठिकाणी विद्युत नाही. ग्रामपंचायतीने एलईडी टीव्ही दिला आहे. पण विद्युत नसल्याने टीव्ही धूळखात पडून आहे. २०१८ मध्ये विजेचे खांब लावण्यात आले होते. परंतु अजूनपर्यंत गावात वीज पोहोचली नाही. त्यामुळे या गावातील नागरिकांनी अजूनपर्यंत विजेचा प्रकाश बघितला नाही. दिव्याच्या मिनमिनत्या प्रकाशातच रात्र काढावी लागते. गावासभोवताल जंगल असल्याने साप, विंचू यांची भीती आहे. गावाची लोकसंख्या कमी आहे. तसेच गावाला जाण्यासाठी रस्ता नाही. त्यामुळे जिल्हा परिषद, विधान परिषद निवडणुकीदरम्यान उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते गावात येत नाही. त्यामुळे गावातील समस्या शासन व प्रशासनाच्या लक्षात येत नाही. रस्ता बांधून द्यावा, यासाठी प्रशासनाकडे अनेकवेळा पाठपुरावा केला. मात्र प्रशासन व शासनाने दुर्लक्ष केले आहे. रस्ता बांधावा, नाल्यांवर पुलाचे बांधकाम करावे, वीज उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी गावकºयांनी केली आहे.मात्र लोकप्रतिनिधी व प्रशासनातील वरिष्ठ अधिकाºयांनी याकडे दुर्लक्ष केले आहे.गावामध्ये पाण्याची समस्या गंभीरगावात एक हातपंप व दोन सार्वजनिक विहिरी आहेत. यातील दोन्ही विहिरी कुचकामी आहेत. एका विहिरीला पाणीच राहत नाही. दुसरी विहीर मागील वर्षी बांधण्यात आली. परंतु या ठिकाणचा गाळ उपसण्यात आला नाही. त्यामुळे तिचा वापर कुणीच करीत नाही. शेतातील विहिरीचे पाणी वापरले जाते. लाकडे ठेवली असून लाकडांवरून पाणी काढावे लागते.निवडणुकीदरम्यान या गावामध्ये प्रचारही नाहीलहान झेलिया गावाला जाण्यासाठी रस्ता नाही. तसेच गावाची लोकसंख्या कमी आहे. त्यामुळे विधानसभा व लोकसभा निवडणुकीदरम्यान उमेदवार या गावांमध्ये निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी फिरकत नाही. आजर्यंत एकाही लोकप्रतिनिधीने या गावाला भेट दिली नाही. त्यामुळे येथील नागरिकांच्या दशा शासनाला कळू शकल्या नाहीत.
लहान झेलिया गावाला रस्त्याची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2019 6:00 AM
हे गाव कटेझरीपासून पाच किमी अंतरावर आहे. मुरूमगाव-कटेझरीपर्यंत डांबरी रस्ता आहे. कटेझरीवरून मात्र या गावाला जाण्यासाठी रस्ताच नाही. या गावात एकूण १७ घरे आहेत. लोकसंख्या १२० च्या जवळपास आहे. गावात जिल्हा परिषदेची शाळा असून पहिली ते चौथ्या वर्गापर्यंत शिक्षणाची सोय आहे.
ठळक मुद्देदोन नाले पार करीत गाठावे लागते गाव : स्वातंत्र्यानंतर अजूनही गावात वीज पोहोचली नाही