पाटलीण तलावाचे पाणी शेतात शिरल्याने शेतकऱ्याला फटका
By Admin | Published: November 13, 2014 11:03 PM2014-11-13T23:03:11+5:302014-11-13T23:03:11+5:30
चोप येथील पाटलीण तलावाचा तुडूंब पूर्णपणे बंद केल्यामुळे तुडूंबातून निघणारे पाणी कोरेगाव येथील मनोहर म्हस्के या शेतकऱ्याच्या शेतात शिरले तर हरी पर्वते यांच्या धानाच्या पुंजण्यात गेल्याने
कोरेगाव/चोप : चोप येथील पाटलीण तलावाचा तुडूंब पूर्णपणे बंद केल्यामुळे तुडूंबातून निघणारे पाणी कोरेगाव येथील मनोहर म्हस्के या शेतकऱ्याच्या शेतात शिरले तर हरी पर्वते यांच्या धानाच्या पुंजण्यात गेल्याने या दोनही शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तलावाची देखभाल करणारा कर्मचारी दिनेश भिवगडे याच्या निष्काळजीपणामुळे सदर प्रकार झाला, असा आरोप शेतकरी मनोहर म्हस्के व हरी पर्वते यांनी ‘लोकमत’शी बोलतांना केला.
चोप येथील पाटलीन तलाव खचरा नं. ७५६ मध्ये आहे. या तलावाचा जवळपास ५०० ते ६०० एकर निस्तार आहे व डिमांडधारकही आहेत. यावर्षी शेतकऱ्यांना शेवटपर्यंत धानाला पाणी द्यावे लागले व अजूनही तलावात पाणी शिल्लक असल्याने घोडाझरी पाटबंधारे विभागाचा कर्मचारी याच कामाची देखभाल करण्यासाठी पूर्णवेळ पगारावर आहे. तुडूंब पूर्ण बंद न केल्यामुळे कोरेगाव येथील म्हस्के व पर्वते या शेतकऱ्यांच्या शेतात पाणी घुसून कापलेले धान व पुंजण्यातील धान ओले झाले आहे. या प्रकाराची चौकशी करून संबंधीत कर्मचाऱ्यावर कारवाई करावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
शेतात पाणी असल्याने मळणीयंत्र सुद्धा आता शेतापर्यंत जाऊ शकत नाही, अशी परिस्थिती आहे. शिवाय खराब झालेल्या या धानाला बाजारातही भाव मिळणे कठीण आहे. (वार्ताहर)