चिखलातच आठवडी बाजार

By admin | Published: July 27, 2014 11:45 PM2014-07-27T23:45:33+5:302014-07-27T23:45:33+5:30

‘नेमेची येतो पावसाळा’ या म्हणीप्रमाणे गडचिरोली शहरासह परिसरातील हजारो नागरिकांना दरवर्षी पावसाळयात येथील आठवडी बाजारात चिखलाचे दर्शन झाल्याशिवाय राहत नाही. पालिका प्रशासनाच्या

Weekly market in the mud | चिखलातच आठवडी बाजार

चिखलातच आठवडी बाजार

Next

गडचिरोली : ‘नेमेची येतो पावसाळा’ या म्हणीप्रमाणे गडचिरोली शहरासह परिसरातील हजारो नागरिकांना दरवर्षी पावसाळयात येथील आठवडी बाजारात चिखलाचे दर्शन झाल्याशिवाय राहत नाही. पालिका प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे गेल्या अनेक वर्षापासून येथील नागरिकांना पावसाळ्याच्या दिवसात चिखल तुडवूनच बाजार करावा लागत आहे. सद्यस्थितीत आठवडी बाजारात पावसाचे पाणी जमा झाल्यामुळे चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. यामुळे येथील ग्राहक व विक्रेत्यांना त्रास सहन करावा लागत आहे.
जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी गडचिरोली येथे भरणाऱ्या आठवडी बाजारात गडचिरोली शहरासह तालुक्यातील हजारो ग्राहक येतात. तसेच शेकडो विक्रेते भाजीपाला विक्रीसाठी येतात. या बाजारात विक्रेत्यांना बसण्यासाठी प्रशस्त जागा नाही. यामुळे रस्त्यावरच दुकान लावून विक्रेत्यांना बसावे लागत आहे. मिरची विक्रेत्यांचे दुकान तर चिखलाच्या बाजुलाच लावले जातात. भाजीपाला दुकानाच्या अगदी कडेला चिखल साचलेला दिसून येतो. या चिखलात डासांची उत्पत्ती होत असते. हे डास लगतच्या भाजीपाल्यावर बसत असतात. मात्र पर्याय नसल्याने येथील ग्राहक त्याच स्थितीतला भाजीपाला खरेदी करतात. यामुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
चिखलमय आठवडी बाजाराचे दर्शन गेल्या अनेक वर्षापासून येथील ग्राहक व विक्रेत्यांना होत आहे. मात्र पालिका प्रशासनाने या आठवडी बाजारात सिमेंट काँक्रीट रस्ते तसेच ओटे बांधून कायमस्वरूपी सुविधा अद्यापही केली नाही. यामुळे ग्राहक व विक्रेत्यांमध्ये पालिका प्रशासनाप्रती तीव्र नाराजी असल्याचे दिसून येते. आठवडी बाजारात नाल्यांची व्यवस्था नसल्यामुळे डांबरी मार्गावरील तसेच लगतच्या मार्गावरील पावसाचे पाणी आठवडी बाजार परिसरात साचून राहते. या बाजारात मोकाट जनावरे व डुकरांचाही हैदोस नेहमीचाच आहे. याचा येथील ग्राहक व विक्रेत्यांना प्रचंड त्रास होतो. आठवडी बाजाराच्या माध्यमातून पालिका प्रशासनाला दरवर्षी लिलावादवारे लाखो रूपये उत्पन्न मिळते. मात्र या आठवडी बाजारात कायमस्वरूपी सोयीसुविधा करण्याकडे न.प.चे दुर्लक्ष होत असल्याच्या प्रतिक्रिया अनेक ग्राहक व विक्रेत्यांनी व्यक्त केल्या आहेत. आठवडी बाजारात जागा अपुरी पडत असल्याने चंद्रपूर या डांबरीकरण मार्गावर तसेच त्रिमूर्ती चौकातून बाजाराकडे जाणाऱ्या मुख्य मार्गावर दुकाने लावली जातात. यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. बोरमाळा मार्गावर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. जोरदार पावसामुळे बाजार करणे अशक्य होते. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: Weekly market in the mud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.