गडचिरोलीतीली गरजूंच्या मदतीसाठी वीरपत्नीची धडपड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2020 06:19 PM2020-04-11T18:19:53+5:302020-04-11T18:21:52+5:30
संचारबंदीचा गोरगरीबांना चांगलाच फटका बसत आहे. मोलमजुरी करून उपजीविका करणाऱ्या कुटुंबांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाल्याने अशा गरजू १०० कुटुंबांच्या मदतीसाठी शहीद पोलीस जवानाच्या पत्नीने शिवराय सामाजिक संस्थेच्या माध्यमातून मदतीचा हात पुढे केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू केलेल्या संचारबंदीचा गोरगरीबांना चांगलाच फटका बसत आहे. मोलमजुरी करून उपजीविका करणाऱ्या कुटुंबांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाल्याने अशा गरजू १०० कुटुंबांच्या मदतीसाठी शहीद पोलीस जवानाच्या पत्नीने शिवराय सामाजिक संस्थेच्या माध्यमातून मदतीचा हात पुढे केला.
नक्षलविरोधी अभियानादरम्यान गडचिरोली पोलीस दलातील जवान विलास मांदाडे हे शहीद झाले होते. त्यांच्या वीरपत्नी संगीता मांदाडे यांना लॉकडाऊनच्या काळात होत असलेली गोरगरीब नागरिकांची ससेहोलपट पहावली नाही. त्यांच्यासाठी काही केले पाहीजे या आंतरिक इच्छेतून त्यांनी शिवराय सामाजिक संस्थेमार्फत मदत वाटपाची इच्छा व्यक्त केली. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनीही त्यांचा प्रस्ताव लगेच मान्य करत गडचिरोलीजवळील नवेगाव (मुरखळा) आणि दिभना (माल) या गावातील १०० कुटुंबांना जीवनावश्यक वस्तू वाटप करण्यासाठी पुढाकार घेतला. कामे बंद असल्यामुळे पोटाची खळगी भरण्याचा प्रश्न निर्माण झालेल्या गरीब, मजूर, निराधार, अपंग, निराधार विधवा महिला अशांची निवड केली. त्यांना तांदूळ, डाळ, तेल, तिखट, मीठ, चहाचे साहित्य आणि भाजीपाला अशा वस्तू देण्यात आल्या.
या कामात त्यांना शिवराय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष परमानंद पुन्नमवार सचिव सुरज बोरकुटे, भास्कर पेटकर, आकाश पोहनकर, श्रेयस जुमनाके, शुभम देवलवार आणि संस्थेच्या सर्व सदस्यांनी सहकार्य केले. सदर साहित्य वाटप करताना दिभना (माल) गावचे सरपंच उमाकांत जुमनाके, ग्रामसेवक वासंती देशमुख तसेच नवेगाव (मुरखळा) गावचे ग्रामपंचायत सदस्य राजू खंगार व इतर नागरिक आदी उपस्थित होते.