महिलांनी १०० ड्रम गुळसडवा केला नष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 11:43 PM2019-04-16T23:43:07+5:302019-04-16T23:43:30+5:30
दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात अहेरी तालुक्याच्या बोरी गावालगत प्राणहिता नदीच्या परिसरात दारू गाळणाऱ्यांवर मुक्तिपथ गाव संघटनेच्या महिलांनी पोलिसांच्या सहकार्याने धडक कारवाई केली. यात तब्बल १०० ड्रम गुळसडवा नष्ट करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
अहेरी : दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात अहेरी तालुक्याच्या बोरी गावालगत प्राणहिता नदीच्या परिसरात दारू गाळणाऱ्यांवर मुक्तिपथ गाव संघटनेच्या महिलांनी पोलिसांच्या सहकार्याने धडक कारवाई केली. यात तब्बल १०० ड्रम गुळसडवा नष्ट करण्यात आला. तसेच दारू गाळण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य व ड्रम जाळून नष्ट केले.
राजपूर पॅच येथील मुक्तिपथ गाव संघटनेच्या महिलांनी सोमवारी ही कारवाई केली. यावेळी अहेरी पोलीस ठाण्याचे कर्मचारी उपस्थित होते. अहेरीपासून २० किमी अंतरावरील बोरी गावालगत असलेल्या प्राणहिता नदीवर गावठी दारू गाळण्याचा प्रकार गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. उन्हाळ्यामुळे नदीपात्राचा काही भाग कोरडा पडत असल्याने नदीमधील झाडाझुडपांमध्ये हा सडवा लपून ठेवला जातो. राजपूरपॅच व बोरी या दोन्ही गावातील लोक दारू गाळण्याचे काम करतात. चार दिवसांपूर्वी राजपूरपॅच येथील महिलांनी दिना नदी परिसरात असलेला गुळसडवा नष्ट केला होता.
सडव्याचे साठे बोरी गावालगतच्या प्राणहिता नदी परिसरात असल्याची माहिती राजपूरपॅच येथील महिलांना मिळाली होती. त्यांनी बोरी येथील महिलांना याबाबत माहिती देत अहिंसक कृती करण्याचे आवाहन केले. पण बोरी येथील महिला तयार नसल्याने राजपूरपॅच येथीलच महिला व युवकांनी कृती करण्याचा निर्णय घेतला. बोरी येथील पोलीस पाटील सत्यवान मोहुर्ले कारवाईत सहभागी झाले.
अहेरीचे पोलीस निरीक्षक सतीश होडगर यांना याबाबत माहिती देण्यात आली. त्यानंतर त्यांनी हवालदार घाटघुमर यांना कारवाईसाठी घटनास्थळावर पाठविले. या धडक कारवाईत नदी परिसरात गुळसडवा भरून ठेवलेले प्लास्टिक ड्रम महिला व युवकांनी नष्ट केले. महिला व पोलिसांना पाहून दारू गाळणाऱ्यांनी पळ काढला.