पाच हजार घरकुलांचे काम अपूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2019 12:16 AM2019-02-18T00:16:57+5:302019-02-18T00:17:57+5:30
प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण अंतर्गत) सन २०१६-१७ ते २०१८-१९ या तीन वर्षांच्या कालावधीत गडचिरोली जिल्ह्यात एकूण १० हजार १७५ घरकुलांना आॅनलाईन मंजुरी प्रदान करण्यात आली. मात्र गडचिरोली जिल्ह्यातील रेतीघाटांचे लिलाव अद्यापही झाले नसल्याने रेती मिळेनाशी झाली आहे.
दिलीप दहेलकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण अंतर्गत) सन २०१६-१७ ते २०१८-१९ या तीन वर्षांच्या कालावधीत गडचिरोली जिल्ह्यात एकूण १० हजार १७५ घरकुलांना आॅनलाईन मंजुरी प्रदान करण्यात आली. मात्र गडचिरोली जिल्ह्यातील रेतीघाटांचे लिलाव अद्यापही झाले नसल्याने रेती मिळेनाशी झाली आहे. परिणामी गडचिरोली जिल्ह्यातील घरकुलांचे काम प्रभावित झाले आहेत. तीन वर्षांतील मिळून अद्यापही पाच हजार ४९ घरकुलाचे काम अपूर्ण स्थितीत आहे.
२०१६-१७ ते २०१८-१९ या तीन वर्षांचे मिळून गडचिरोली जिल्ह्याला एकूण १० हजार १८७ घरकुलांचे उद्दिष्ट देण्यात आले. यापैकी १० हजार १८७ घरकूल मंजूर करण्यात आले. त्यापैकी १० हजार १७५ घरकुलांच्या कामांना आॅनलाईन मंजुरी प्रदान करण्यात आली. यामध्ये आहेरी तालुक्यात १ हजार ९४२, आरमोरी तालुक्यात ७२५, भामरागड तालुक्यात २४६, चामोर्शी ८६३, देसाईगंज ४४६, धानोरा ७९७, एटापल्ली ५४९, गडचिरोली ६५७, कोरची ६५७, कुरखेडा ११२१, मुलचेरा २८५ व सिरोंचा तालुक्यात १ हजार ८८७ घरकुलांचा समावेश आहे. तीन वर्षांचे मिळून आतापर्यंत बांधकाम पूर्ण झालेल्या घरकुलांची टक्केवारी केवळ ५०.३२ आहे. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या वतीने घरकुलाचे बांधकाम पूर्ण केलेल्या एकूण ३ हजार १३१ लाभार्थ्यांना चवथ्या हप्त्याच्या अनुदानाची रक्कम आॅनलाईन स्वरूपात अदा करण्यात आली आहे. गडचिरोली जिल्ह्यात १३५ घरकुलांच्या कामांना अद्यापही सुरुवात करण्यात आली नाही. यामध्ये अहेरी तालुक्यातील सर्वाधिक ६८, एटापल्ली १७, सिरोंचा १२, भामरागड ९ व चामोर्शी तालुक्यातील १० घरकुलांचा समावेश आहे. गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून गडचिरोली जिल्ह्यात रेती मिळत नसल्याने घरकुलाचे बांधकाम रखडले आहे. याशिवाय शासकीय इमारतीचे कामे प्रभावित झाले आहेत. रेतीसाठी घरकूल लाभार्थी ट्रॅक्टरधारकांकडे धावपळ करीत आहेत.
कंत्राटदारांचा रस्ता खडीकरणावर भर
लिलाव प्रक्रियेअभावी रेतीचा तुटवडा निर्माण झाल्याने शहरासह जिल्हाभरातील कंत्राटदारांचा रस्ता खडीकरणाच्या कामावर भर असल्याचे दिसून येत आहे. सिमेंट काँक्रीट रस्त्याची कामे ठप्प आहेत.
अहेरी उपविभागात कामाची गती मंदावली
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अहेरी उपविभागाच्या मुलचेरा, सिरोंचा, एटापल्ली, भामरागड व अहेरी या पाच तालुक्यात २०१६-१७ ते २०१८-१९ या तीन वर्षांच्या कालावधीत हजारो घरकुले मंजूर करण्यात आली आहेत. मात्र या उपविभागात ४० टक्केच घरकुलाचे काम प्रगतीपथावर आहे. रेतीघाटांअभावी रेती मिळणे कठीण झाले आहे. तसेच लाभार्थ्यांची अनास्था, प्रशासकीय उदासीनता व इतर कारणामुळे अहेरी उपविभागात घरकुला बांधकामात गती नसल्याचे दिसून येत आहे.