क्रीडा संकुलाचे काम लांबणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2019 11:42 PM2019-05-17T23:42:01+5:302019-05-17T23:42:57+5:30
जिल्हा मुख्यालय असूनही सुसज्ज क्रीडा संकुलापासून वंचित असलेल्या गडचिरोलीकरांना जिल्हा क्रीडा संकुलासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. गेल्या फेब्रुवारी महिन्यात जागेचे हस्तांतरण करून निविदा प्रक्रिया निघणे अपेक्षित होते. परंतू प्रस्तावित क्रीडा संकुलाच्या जागेवर वाढलेले अतिक्रमण कोणी आणि कसे हटवायचे, हा प्रश्न निर्माण झाल्याने वनविभागाकडून त्या जागेचे हस्तांतरण होऊ शकले नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्हा मुख्यालय असूनही सुसज्ज क्रीडा संकुलापासून वंचित असलेल्या गडचिरोलीकरांना जिल्हा क्रीडा संकुलासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. गेल्या फेब्रुवारी महिन्यात जागेचे हस्तांतरण करून निविदा प्रक्रिया निघणे अपेक्षित होते. परंतू प्रस्तावित क्रीडा संकुलाच्या जागेवर वाढलेले अतिक्रमण कोणी आणि कसे हटवायचे, हा प्रश्न निर्माण झाल्याने वनविभागाकडून त्या जागेचे हस्तांतरण होऊ शकले नाही. आता राज्यात नवीन सरकार सत्तारूढ झाल्यानंतरच या कामाला वेग येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
लांझेडा येथील वनविभागाच्या ६.९६ हेक्टर जागेवर हे क्रीडा संकुल उभारले जाणार आहे. अनेक वर्षांपासून वनविभागाच्या जाचक अटी पूर्ण केल्यानंतर गेल्या सहा महिन्यांपूर्वी वनविभागाने ती जागा जिल्हा क्रीडा समितीला हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला होता. त्या जागेचा मोबदला (पर्यायी जागेवर वनीकरणाचा खर्च) म्हणून १ कोटी २९ लाख ९९ हजार रुपये वनविभागाकडे आधीच क्रीडा समितीने भरले आहेत.
परंतू आता प्रत्यक्ष जागेचे मोजमाप केले असता ६.९६ हेक्टर जागा शिल्लकच नसल्याचे आढळले. ती जागा कागदोपत्री वनविभागाची असली तरी प्रत्यक्षात त्या जागेचा बराच भाग अनेकांनी बळकावला आहे. आता त्या अतिक्रमणधारकांना हटवून वनविभागाला आपल्या रेकॉर्डनुसार पूर्ण जागा क्रीडा समितीकडे हस्तांतरित करण्यासाठी कसरत करावी लागणार आहे.
वनविभागाच्या नियमानुसार जागेचा मोबदला वनविभागाने आधीच क्रीडा समितीकडून वसुल केला आहे. याशिवाय लांझेडा येथील प्रस्तावित क्रीडा संकुलाच्या जागेच्या बदल्यात पर्यायी जागा म्हणून दुप्पट जागा वनविभागाला देण्यात आली. त्यामुळे आता दिलेल्या मोबदल्यानुसार पूर्णच जागा ताब्यात द्या, अशी भूमिका क्रीडा समितीने घेतली आहे. अशा स्थितीत वनविभागासमोर अतिक्रमण हटविण्याशिवाय दुसरा पर्याय राहिलेला नाही. आता त्याचा मुहूर्त केव्हा निघणार आणि त्यासाठी वनविभाग कोणाची मदत घेणार याकडे क्रीडा प्रेमींचे लक्ष लागले आहे.
२४ कोटी मंजूर होऊनही कुचकामी
आघाडी सरकारच्या काळात प्रत्येक तालुका मुख्यालयी तालुका क्रीडा संकुल उभारण्यास मंजुरी देऊन प्रत्येकी १ कोटी रुपयांचे अनुदान मंजूर केले होते. मात्र अद्याप अनेक तालुका क्रीडा संकुल अपूर्णच आहेत. विद्यमान युती शासनाने तालुका क्रीडा संकुलाचे अनुदान १ कोटीवरून ५ कोटी तर जिल्हा क्रीडा संकुलाचे अनुदान ८ वरून १६ कोटी रुपये केले आहे. त्यामुळे गडचिरोलीच्या क्रीडा संकुलासाठी १६ कोटी मिळणार होते. परंतू गडचिरोली जिल्ह्यातील खेळाडूंच्या क्रीडा विकासाला चालना देण्यात कसर राहू नये म्हणून राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विशेष बाब म्हणून क्रीडा संकुलासाठी २४ कोटीच्या अनुदानाला प्रशासकीय मंजुरी दिली. परंतू जागेचाच प्रश्न अजून दूर झाला नसल्यामुळे निविदा प्रक्रियेसह सर्वच कामे ठप्प पडली आहेत.
क्रीडा संकुलासाठी मंजूर झालेली जागा वनविभागाच्या नावावर असल्यामुळे त्यावरील अतिक्रमण हटविण्याची जबाबदारी आमचीच आहे. सर्व्हेक्षण नुकतेच झाले आहे. त्यामुळे किती जागेवर अतिक्रमण आहे हे पाहून पुढील कारवाई केली जाईल.
- एस.आर.कुमारस्वामी,
उपवनसंरक्षक, गडचिरोली