यंदा जिल्ह्यात युरिया खताची टंचाई नाही
By admin | Published: October 10, 2016 12:52 AM2016-10-10T00:52:55+5:302016-10-10T00:52:55+5:30
कृषी विभागाच्या मागणी प्रमाणे केंद्र शासनाकडून युरिया खताचा पुरवठा उपलब्ध होत असल्याने ...
शेतकऱ्यांना दिलासा : तीन हजार मेट्रिक टन साठा शिल्लक
गडचिरोली : कृषी विभागाच्या मागणी प्रमाणे केंद्र शासनाकडून युरिया खताचा पुरवठा उपलब्ध होत असल्याने यावर्षी पहिल्यांदाच युरिया खताचा तुटवडा निर्माण झाला नाही. अद्यापही जिल्ह्यात ३ हजार ८१ मेट्रिक टन युरिया खत उपलब्ध आहे, अशी माहिती जिल्हा परिषद कृषी विभागाच्या सूत्रांकडून मिळाली आहे.
धानपीक गर्भात आल्यानंतर शेतकरी धानपिकाला युरिया खत देत असल्याने सप्टेंबर ते आॅक्टोबर महिन्यात युरिया खताची मागणी अचानक वाढते व या कालावधीत पुरेसा युरिया खत उपलब्ध राहत नसल्याने युरिया खताची टंचाई निर्माण होते. याचा गैरफायदा जिल्ह्यातील अनेक कृषी केंद्र संचालक यापूर्वी घेत होते. शेतकऱ्यांकडून युरिया खतासाठी अतिरिक्त किंमत आकारली जात होती. यावर्षी मात्र अगदी सुरुवातीपासूनच युरिया खताचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. त्याचबरोबर डीएपी खत १ हजार १०७ मेट्रिक टन, एसएसपी १ हजार ४६१, एमओपी खत ११४ मेट्रिक टन, संयुक्त खते १ हजार २२० व मिश्र खते २ हजार १८ मेट्रिक टन उपलब्ध आहे. रब्बी हंगामात डीएपी, मिश्र खते वापरली जातात. त्यामुळे रब्बीतही खतांचा तुटवडा निर्माण होणार नाही, असा दावा जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने व्यक्त केला आहे.
मागास गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बी-बियाणे व खतासाठी धावपळ करावी लागू नये, यासाठी जि. प. च्या कृषी विभागाने योग्यरित्या नियोजन करून शासनाकडे खताच्या मागणीचा प्रस्ताव खरीप हंगामाच्या पूर्वीच सादर केला होता. त्यानंतर कृषी अधिकाऱ्यांनी वारंवार पाठपुरावा करून गडचिरोली जिल्ह्याला खताचा साठा उपलब्ध करून देण्याची विनंती केली. गरजेनुसार जिल्ह्याच्या बाराही तालुक्यात संबंधित कृषी केंद्रात खत वेळेवर पोहोचावे, अशी वितरण व वाहतूक व्यवस्था जि. प. च्या कृषी विभागाने यंदा राबविली. त्यामुळे यावर्षी प्रथमच दुर्गम व अतिदुर्गम भागातीलही शेतकऱ्यांना खत वेळेत व सहज उपलब्ध झाले. पुरेशा प्रमाणात खत दिल्यामुळे यंदा धानपिकाचे उत्पादन वाढणार आहे. (प्रतिनिधी)
३७ हजार मेट्रिक टन खताची विक्री
जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार यंदाच्या खरीप हंगामात आतापर्यंत सर्व प्रकारची मिळून एकूण ३७ हजार ९९४ मेट्रिक टन खताची विक्री जिल्ह्यातील अधिकृत कृषी केंद्रांमार्फत झाली आहे. यामध्ये युरिया १९ हजार मेट्रिक टन, डीएपी १ हजार १४० मेट्रिक टन, एसएसपी ३ हजार १२० मेट्रिक टन, एमओपी २०० मेट्रिक टन, संयुक्त खते ६ हजार ५३४ मेट्रिक टन व ८ हजार मेट्रिक टन मिश्र खताची विक्री आतापर्यंत झाली आहे. यंदा जिल्हाभरातील कृषी केंद्रातून सहज खत मिळाल्याने शेतकऱ्यांची अडचण जाणवली नाही.