‘कट प्रॅक्टीस’ हा वैद्यकीय व्यवसायाला लागलेला रोग! - तात्याराव लहाने 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2017 04:40 AM2017-09-11T04:40:04+5:302017-09-11T04:41:56+5:30

'Cut Practices' Medical Occupation! - Tatyarao Lahane | ‘कट प्रॅक्टीस’ हा वैद्यकीय व्यवसायाला लागलेला रोग! - तात्याराव लहाने 

‘कट प्रॅक्टीस’ हा वैद्यकीय व्यवसायाला लागलेला रोग! - तात्याराव लहाने 

Next

 बाली : ‘जे का रंजले गांजले, त्यांसी म्हणे जो आपुले’, ही तुकोबांची शिकवण आजच्या काळात कट प्रॅक्टीस करणाºया डॉक्टरांचे डोळे उघडण्यासाठीच आहे. रुग्ण पैशाच्या भ्र्रांतीत असतात. त्यामुळे त्यांच्या रोगाचे निदान कमीत कमी खर्चात करणे आवश्यक आहे. मात्र अशा वेळी त्यांना नाडणारी ‘कट प्रॅक्टीस’ ही वैद्यकीय पेशाला लागलेला रोग आहे, अशी टीका ज्येष्ठ नेत्रविकारतज्ज्ञ आणि मुंबईतील सर जे. जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांनी येथे केली.
इंडोनेशियातील बाली येथे सुरू असलेल्या सातव्या विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून ते बोलत होते. डॉ. लहाने यांनी अध्यक्षीय भाषणात अन्यही अनेक महत्त्वाच्या विषयांना हात घातला. त्यांच्या भाषणाचा हा संपादित अंश.
कट प्रॅक्टीस म्हणजे एखाद्या डॉक्टराने रुग्णाला उपचारांसाठी दुसºया डॉक्टराकडे पाठविण्यासाठी कमिशन स्वरुपात पैसे घेणे. गरज नसताना महागड्या चाचण्या सांगून लॅबकडून कमिशन घेणे. या कट प्रॅक्टीसमुळे देशातला सर्वसामान्य नागरिक भरडला जात आहे. यासंबंधी शासनाने कडक पावले उचलायला सुरुवात केली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला याबाबत कारवाईचे विशेष अधिकार देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे, अशी माहिती डॉ. लहाने यांनी या वेळी दिली.
रुग्ण मरावा, असे डॉक्टरला कधीच वाटत नसते. तो रुग्णाला वाचविण्यासाठीच धडपडत असतो. पण तो देव नव्हे. काही प्रकरणांत प्रयत्न करूनही यश मिळत नाही. अशा वेळी रुग्णांच्या नातेवाइकांनीही संयम ठेवायला हवा, असे आवाहनही डॉ. लहाने यांनी या वेळी केले.
लोकसंख्येच्या तुलनेत डॉक्टरांची संख्या वाढली पाहिजे. म्हणून आणखी वैद्यकीय महाविद्यालयांची गरज आहे. तसेच अतिविशेषोपचार विभागांची संख्या वाढविणेही आवश्यक आहे. तसेच देशातील १०४ दशलक्षपेक्षा जास्त लोकसंख्या आदिवासी भागात राहात असून त्यांच्या आरोग्यविषयक गरजांकडे शासनाने लक्ष दिले पाहिजे, असेही ते म्हणाले.
त्याचप्रमाणे, ‘भारतामध्ये अवयवदात्यांचे प्रमाण अत्यंत कमी आहे. याबाबतच्या अंधश्रद्धा, विविध गैरसमज दूर करण्याची नितांत आवश्यकता आहे. मृत्यूनंतर एक देह ७ जणांच्या आयुष्यात आशेचा किरण ठरू शकतो. राज्यात २०१५-१६ साली ४१ जणांनी अवयवदान केले होते. यंदा शासनाच्या महाअवयवदान अभियानानंतर हा आकडा १४१ गेला आहे. ‘अनंत आमुची ध्येयासक्ती, अनंत अन् आशा’ या कुसुमाग्रजांच्या काव्यपंक्तींनुसार, वैद्यकीय क्षेत्राचा आवाका अनंत आहे. तसेच वैद्यकीय क्षेत्रासमोरील आव्हानेही मोठी आहेत,’ असेही लहाने यांनी म्हटले.

आरोग्य सांभाळण्याची जबाबदारी

वैद्यकीय क्षेत्रासमोरील आव्हाने समर्थपणे पेलण्याचे आमचे ध्येय आहे आणि ते ध्येय आम्ही साध्य करू, अशी आम्हाला आशा आहे. सर्वांचे ‘आरोग्य’ अधिकाधिक उत्तम करण्यासाठी आम्ही डॉक्टर नेहमीच प्रयत्नशील असतो; परंतु वैयक्तिक पातळीवर आरोग्य सांभाळण्याची जबाबदारी ही प्रत्येक नागरिकाची आहे, असेही लहाने यावेळी म्हणाले.

Web Title: 'Cut Practices' Medical Occupation! - Tatyarao Lahane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.