सोनसाखळी चोराला १० दिवसांची कोठडी
By admin | Published: September 7, 2014 01:10 AM2014-09-07T01:10:28+5:302014-09-07T01:10:28+5:30
पणजी : सोनसाखळ्या पळविणाऱ्या असदुल्ला जाफरी (४0) याला १० दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली. पणजी
पणजी : सोनसाखळ्या पळविणाऱ्या असदुल्ला जाफरी (४0) याला १० दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली. पणजी पोलिसांनी पकडलेल्या या इराणी गँगमधील संशयिताला शनिवारी न्यायालयात रिमांडसाठी नेण्यात आले होते.
जाफरी याला पकडले असले तरी त्याचे दोन साथीदार मात्र तावडीतून निसटले आहेत. पणजी पोलीस शुक्रवारपासून त्यांचा शोध घेत आहेत. अद्याप ते मिळाले नसल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. या टोळीने पुणे शहरातही अनेक गुन्हे केले आहेत. त्यामुळे पुणे पोलिसांनाही ही टोळी हवी होती. पुणे पोलिसांना या टोळीला पकडल्याची माहिती देण्यात आली आहे. गुरुवारी या चोरट्याने सांतिनेज येथे केलेली चोरी त्यांच्या अंगलट आली. गुरुवारी सकाळी ९.४५ वाजण्याच्या सुमारास सांतिनेज येथे टी. आर. मेन्शनजवळ शांता आनंद राव लेपाक्षी या महिलेशी पोलीस असल्याची बतावणी करून तिच्या गळ्यातील सुमारे ४0 ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र आणि सोनसाखळी मिळून दीड लाख रुपये किमतीचे दागिने पळविले होते. या ठिकाणीच असलेल्या व्यावसायिक अस्थापनांमध्ये बाहेर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमऱ्यात चोरटे टिपले गेले होते. दोनपैकी एकाचा चेहरा आणि दुचाकीचा क्रमांक टिपला गेला होता. या दुचाकी क्रमांकाच्या आधारे त्यांना पकडण्यात आले. पोलिसांनी कळंगुट किनाऱ्यावर सापळा रचून शिताफीने त्यांना पकडले होते. ही कारवाई करीत असतानाच जाफरीचे दोन्ही साथिदार पळून गेले होते. (प्रतिनिधी)