लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव : कोकण रेल्वे मार्गावरील रेल्वेतून विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर रेल्वे प्रशासनाने करडी नजर ठेवली असून, नोव्हेंबर महिन्यात ७ हजार १३ प्रवासांवर कारवाई करताना त्यांच्याकडून २ कोटी ५ लाख ५५ हजार ४४५ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
ऑगस्ट ते ऑक्टोबरपर्यंत फुकट्या प्रवाशांकडून ८६ लाखांचा दंड वसूल केला गेला होता. तीन महिन्यांत एकूण १४,१५० विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवासांना कारवाईला सामोरे जावे लागले होते. त्यातून ८६ लाख ३७ हजार ८२० रुपये दंड वसूल केला गेला होता. ऑगस्टमध्ये ४.४८४ प्रवासांना पकडून २६ लाख ६७ हजार ५५५ रुपये तर सप्टेंबर महिन्यात ४,८८८ प्रवाशांकडून २७ लाख, ९ हजार ७०० रुपये दंड वसूल करण्यात आला होता.
ऑक्टोबर महिन्यात ४,७७८ जणांवर कारवाई करून ३२ लाख ६० हजार ५६५ रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांनी वैध तिकिटासह प्रवास करावा, असे आवाहन कोकण रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.