गोव्यातील 4 हजार विद्यार्थ्यांना मिळणार नोबेल विजेत्यांशी थेट संवादाची अपूर्व संधी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2017 02:44 PM2017-11-03T14:44:00+5:302017-11-03T14:44:26+5:30
गोव्यातील सुमारे 4 हजार विद्यार्थ्यांना फेब्रुवारी महिन्यात नोबेल विजेत्या मान्यवरांशी संवाद साधण्याची अपूर्व संधी प्राप्त होणार आहे.
पणजी : गोव्यातील सुमारे 4 हजार विद्यार्थ्यांना फेब्रुवारी महिन्यात नोबेल विजेत्या मान्यवरांशी संवाद साधण्याची अपूर्व संधी प्राप्त होणार आहे. गोवा सरकार आणि केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाचा जैवविविधता विभाग यांच्यात शुक्रवारी महत्त्वपूर्ण करार झाला. या करारांतर्गत हे वेगळे उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून फेब्रुवारी 3 फेब्रुवारी कार्यक्रम जाणार आहेत.
2 फेब्रुवारी रोजी विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रातील नोबेल विजेत्यांशी थेट संवाद साधण्याची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. इयत्ता आठवी ते दहावीपर्यंतचे प्रत्येक विद्यालयातील 9 विद्यार्थी तर अकरावी आणि बारावी उच्च माध्यमिक विद्यालयातील प्रत्येकी 14 विद्यार्थी थेट संवादाच्या कार्यक्रमात सहभागी करून घेतले जातील. विद्यार्थ्यांची त्या-त्या क्षेत्रातील त्यांची कार्यक्षमता तपासूनच निवड केली जाईल.
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी करार झाल्यानंतर पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. राज्यातील शिक्षणाचा दर्जा वाढावा यासाठी सरकार आवश्यक ते सर्व प्रयत्न करीत असल्याचे ते म्हणाले . विज्ञानावर आधारित असे विशेष प्रदर्शन फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी या कालावधीत राज्यात भरविण्यात येणार असून विद्यार्थ्याने या प्रदर्शनाचा लाभ घेता येणार आहे. केंद्रीय विज्ञान-तंत्रज्ञान मंत्रालयाच्या जैवविविधता विभागातर्फे उपस्थित विजय राव म्हणाले की, या उपक्रमासाठी गोवा सरकारने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
लहान राज्यात असले तरी गोव्यासमोर अनेक आव्हाने आहेत. येथील शिक्षणाचा दर्जा वाढविण्यासाठी मुख्यमंत्री पर्रीकर करीत असलेल्या प्रयत्नांची वाखाणणी करून राव म्हणाले की, केवळ तंत्रज्ञानच महत्त्वाचे नसून विज्ञानाची तेवढीच गरज आहे . लोकांनी बदल स्वीकारायला हवेत. या क्षेत्रातील नोबेल विजेत्यांचा गट आमच्याकडे उपलब्ध आहे. स्वीडनचे येथे भरणार असलेले प्रदर्शन विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे . नोबेल मीडियाचे कार्यकारी अधिकारी म्हणाले की, गोव्यासारख्या विकसित राज्याला हा उपक्रम फार उपयुक्त ठरणार आहे. राज्याचे वित्त सचिव दौलतराव हवालदार यावेळी उपस्थित होते