वास्को : दाबोळी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील धावपट्टीचे दुरुस्तीकाम हाती घेण्यात येणार असल्याने या विमानतळावरील हवाई सेवा येत्या १७ एप्रिल ते २१ एप्रिल २०१७ या काळात ठराविक काळासाठी बंद राहणार आहे़या पाच दिवसांच्या काळात सकाळ ते दुपारपर्यंत धावपट्टीच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे़ गेल्या वर्षी ऐन पर्यटन मोसमाच्या काळात बरेच दिवस या धावपट्टीच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आल्याने पर्यटन व्यवसायावर परिणाम झाला होता. तसेच विमान सेवा कंपन्यांची बरीच गैरसोय झाली होती; पण यंदा हे दुरुस्तीकाम केवळ पाच दिवसच चालणार असल्याने त्याचा कोणताही परिणाम विमान सेवेवर होणार नाही़ या कामाबद्दलची माहिती भारतीय नौदलाने तसेच भारतीय विमान प्राधिकरणाने विमान सेवा कंपन्यांना दिलेली असल्याने या कंपन्यांनी पाच दिवस आपल्या वेळापत्रकात आवश्यक ते बदल केलेले आहेत़दि़ १७ व १८ असे दोन दिवस पहाटे ५़३० ते दुपारी १२़३० या वेळेत आगमन व प्रयाण करणाऱ्या विमानांचे वेळापत्रक बदलणार आहे़ तसेच दि़ १९ ते २१ असे तीन दिवस सकाळी ७़३० ते दुपारी १२़३० या वेळेत येणाऱ्या-जाणाऱ्या विमानांच्या वेळापत्रकातही बदल होणार आहे. मात्र, दुपारी १२़३०नंतर धावपट्टी खुली राहणार आहे, असे दाबोळी विमानतळाचे संचालक बी़एच़ नेगी यानी सांगितले़ दर दिवशी दाबोळी विमानतळ सकाळी ९़३० ते दुपारी १२़३० वाजेपर्यंत नौदलासाठी बंद ठेवण्यात येत असल्याने पुढील पाच दिवस हवाई विमानसेवेवर या निर्बंधाचा फारसा परिणाम होणार नाही़ (प्रतिनिधी)
दाबोळीत विमान वाहतुकीवर सोमवारपासून ५ दिवस निर्बंध
By admin | Published: April 15, 2017 2:06 AM