गोव्यात आजपासून ६१ दिवसांची मासेमारी बंदी लागू; जेटी सील
By वासुदेव.पागी | Published: May 31, 2023 06:43 PM2023-05-31T18:43:03+5:302023-05-31T18:43:45+5:30
मासेमारी बंदीमुळे राज्यातील सर्वच जेट्टीवर कामगारांची लगबग
वासुदेव पागी, पणजी: राज्यात आज, गुरुवारपासून पुढील ६१ दिवसांसाठी ट्रॉलर्सद्वारे मासेमारी बंदीचा आदेश जारी करण्यात आला आहे. ३१ जुलैपर्यंत हा बंदीचा काळ असेल. राज्यातील सर्व मच्छीमार जेटी सील करण्याचे आदेशही जारी झाले आहेत. मासेमारी बंदीमुळे राज्यातील सर्वच जेट्टीवर कामगारांची लगबग चालली आहे. येथील मालीम मच्छीमारी जेटीवर जाळी, सामानाची बांधाबांध सुरू झाली असून परप्रांतीय कामगार दिवसरात्र काम करीत असल्याचे दृश्य दिसत आहे.
मासेमारी बंदी लागू झाल्यामुळे समुद्रात आणि प्रादेशिक पाण्यात यांत्रिकी होड्यांद्वारे मासेमारीस उतरण्यास बंदी आहे. गोवा सरकारने, मासळी संवर्धनाची गरज लक्षात घेऊन, यांत्रिक साधनांनी बसवलेल्या मासेमारी जहाजांद्वारे आणि ट्रॉलर्स-नेट आणि पर्स-सीन नेटद्वारे मासेमारी करण्यावर बंदी घातली आहे. केवळ गिल नेट (लहान जाळी) वापरून नोंदणीकृत मोटार लावलेल्या लहान होड्यांद्वारे मासेमारी करण्यास परवानगी असेल.
मासेमारी बंदीच्या काळात आदेशाचे उल्लंघन करून मासेमारी करण्याचे अनेक प्रकार यापूर्वी उघडकीस आल्याने त्याची उच्च न्यायालयानेही गंभीर दखल घेतली होती. बंदी काळात मासेमारी होऊ नये यासाठी यंत्रणांना सज्ज राहण्यास खंडपीठाने सांगितले आहे. त्यामुळे यावर्षी यंत्रणांना सतर्क राहावे लागणार आहे.
मालीम जेटीवर लगबग
मालीम जेट्टीवर विविध राज्यांतून मोठ्या संख्येने कामगार काम करतात. जेटीवर सुमारे सहाशेपेक्षा अधिक कामगार कार्यरत असून उत्तरेकडील आंध्र प्रदेश, झारखंड, उत्तर प्रदेश, बिहार, उत्तराखंड येथील तर दक्षिणेकडील कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळमधील कामगारांचा यात समावेश आहे. काही बोटमालक कामगारांना गोव्यातच ठेवणार असल्याचे सांगण्यात आले. जेटीवरील एक बोटीचे व्यवस्थापक दत्तराज दाभोळकर यांनी मागील हंगामात मासेमारी व्यवसाय चांगला झाल्याचे सांगितले.