पणजी: गोवा जैवविविधता मंडळाने गेल्या वर्षीपासून नैसर्गिक रंग तयार करण्याचे प्रशिक्षण अनेक महिलांना दिले आहे. तसेच विविध केंद्रावर हा रंग तयार केला जात आहे. गेल्या वर्षी या रंगाला चांगला प्रतिसाद लाभला आहे. यावर्षीही माेठ्या प्रमाणात आम्ही नैसर्गिक रंग उपलब्ध करणार आहोत, असे जैवविविधता मंडळाचे सदस्य सचिव प्रदीप सरमोकादम यांनी सांगितले.
प्रदीप सरमोकादम म्हणाले, गेल्या वर्षी डीएमसी महाविद्यालयामार्फत आम्ही विद्यार्थ्यांना नैसर्गिक रंग तयार करण्याचे प्रशिक्षण दिले होते. तसेच राज्यातील जैवविविधता मार्फत विविध केंद्रावर महिलांना हे रंग तयार करण्याचे प्रशिक्षण दिले आहे. जास्तीत जास्त नैसर्गिक रंग वापरासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. यंदाच्या शिमगाेत्सवात लाेकांनी नैसर्गिक रंगाचा वापर जास्तीत जास्त करावा यासाठी हा रंग उपलब्ध केला जाणार आहे. जैवविविधता मंडळाकडे हा रंग उपलब्ध असून तो वापरला जाणार आहे.
शिमगोत्सवात रंगाला मोठी मागणी असते बाजारात सहज रसायनिक रंग उपलब्ध असतात. तो स्वस्त दरात मिळताे पण नैसर्गिक रंग कमी दरात परवडत नाही. त्यामुळे भविष्यात प्रत्येक गावागावामध्ये हा रंग तयार करण्याची चळवळ उभी राहावी यासाठी महिलांना मोठ्या प्रमाणात प्रशिक्षण उपलब्ध करुन दिले जात आहे. यामुळे लाेक नैसर्गिक रंगाचा जास्त प्रमाणात वापर करु शकणार, असे यावेळी प्रदीप सरमाेकादम म्हणाले.