कळंगुट परिसरात बेवारस वाहनावर कारवाई!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2023 12:22 PM2023-04-05T12:22:37+5:302023-04-05T12:25:05+5:30
दर दिवशी हजारोंच्या संख्येने पर्यटक किनाऱ्यावर आनंद लुटण्यासाठी येत असतात.
- काशीराम म्हाबरे
म्हापसा : पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या कळंगुट पंचायतीनेवाहतूक पोलिसांच्या सहाय्याने पंचायत कार्यक्षेत्रातील रस्त्याच्या कडेला बेवारसपणे सोडून देण्यात आलेल्या वाहनांवर कारवाईची मोहीम हाती घेतली आहे.
दर दिवशी हजारोंच्या संख्येने पर्यटक किनाऱ्यावर आनंद लुटण्यासाठी येत असतात. येणाऱ्या पर्यटकांनी सुद्धा वाहने पार्क करताना काळजी घेण्याची गरज असल्याची माहिती कळंगुटचे सरपंच जोझफ सिक्वेरा यांनी दिली. बेवारस वाहनावरील कारवाईमुळेवाहने पार्क करण्यास होणारी अडचण दूर करण्याचा प्रयत्न पंचायतीकडून केला जात असल्याचे ते म्हणाले.
मोहीमेदरम्यान मोडकळीस आलेल्या किंवा नादुरुस्त झालेल्या चारचाकी आणि दुचाकी गाड्या रस्त्याच्या कडेला टाकून देण्यात आल्याचे आढळून आले. सदर वाहने जप्त करण्यात आली आहेत. जप्त करण्यात आलेल्या वाहनांच्या मालकांना नोटिसा बजावल्या जाणार असून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
आम्ही रस्त्यावर सोडलेली किंवा नो पार्किंग परिसरात उभी केलेली वाहने हटवण्याची मोहीम सुरू केली आहे. लोकांनी आपली वाहने अशा अवस्थेत सोडून देऊन इतरांना त्रास करू नये आसे आवाहन सिक्वेरा यांनी केले आहे. पंचायतीला कळंगुट परिसर स्वच्छ करायचा असल्याची माहिती देऊन जप्त केलेल्या वाहनाचा मालक आढळून न आल्यास त्या वाहनांचा योग्य प्रक्रियेनंतर जाहीर लिलाव करण्याचा इशाराही सिक्वेरा यांनी दिला.