पणजी : गोव्यात सात ठिकाणी कार्निव्हलसाठी सरकारने बक्षिसांची रक्कम आणि पायाभूत सुविधांकरिता मिळून १ कोटी ४७ लाख ५0 हजार रुपये मंजूर केले आहेत. मिरवणुकांच्यावेळी रस्त्यावर मद्यपानास कडक मनाई असून चित्ररथ गोव्याची संस्कृती, परंपरा यावरच आधारलेले असावेत अन्यथा सहभागी करुन घेतले जाणार नाही.
पर्यटनमंत्री मनोहर ऊर्फ बाबू आजगांवकर यांनी यंदाचे ‘किंग मोमो’ शॅलॉम सार्दिन यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. मंत्री म्हणाले की, ‘कार्निव्हलच्या माध्यमातून पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत. येत्या २२ ते २५ असे चार दिवस कार्निव्हल चालणार आहे. राजधानी पणजीसह म्हापसा, मडगांव, वास्को, कुडचडें, केपें आणि मोरजी आदी कार्निव्हलच्या मिरवणुका होतील. मिरवणुकीचा आनंद लुटताना भर रस्त्यावर मद्यपान करण्यास बंदी असेल. २२ रोजी पणजीत मिरवणूक होईल. ६ लाख ४0 हजार रुपये बक्षिसांसाठी आणि २0 लाख ९५ हजार रुपये पायाभूत सुविधांसाठी मिळून २७ लाख ३५ हजार रुपये पणजी कार्निव्हल समितीला दिले जातील. मडगांव आणि वास्को येथे कार्निव्हलसाठीही तेवढीच रक्कम सरकारकडून दिली जाईल व बक्षिसांची रक्कमही तेवढीच असेल. म्हापशातील मिरवणुकीसाठी २२ लाख ३५ हजार रुपये. कुडचडें, मोरजी आणि केपेंतील मिरवणुकीसाठी प्रत्येकी १४ लाख २५ हजार रुपये दिले जातील.
मंत्री आजगांवकर म्हणाले की, ‘सीएए किंवा अन्य वादग्रस्त विषयांवर चित्ररथांना स्थान मिळणार नाही. तसेच जाहिरातबाजी करणाºया व्यावसायिक चित्ररथांनाही स्थान दिले जाणार नाही. गोव्याची संस्कृती, परंपरा दाखवणारे चित्ररथ असावेत. छाननी समिती यावर बारकाईने नजर ठेवणार आहे. दरम्यान, राज्य अर्थसंकल्पात अबकारी कर वाढविल्याने मद्य व्यवसाय संकटात आला आहे. पर्यटनावरही परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे त्याबद्दल विचारले असता कर कमी व्हायला हवा, असे आजगांवकर म्हणाले. पत्रकार परिषदेस पर्यटन संचालक मिनीन डिसोझा हेही उपस्थित होते. यावेळी मंत्र्यांच्या हस्ते ‘व्हिवा कार्निव्हाल’ या गाण्याच्या सीडीचे विमोचन करण्यात आले.
‘किंग मोमो’चे आवाहन दरम्यान, ‘किंग मोमो’ म्हणून निवड झालेले शॅलॉम सार्दिन म्हणाले की, ‘ कार्निव्हलच आनंद सर्वांनी लुटावा, परंतु त्याचबरोबर आपला आनंद हा दुसºयासाठी वेदना ठरु नये याचीही काळजी घ्यावी. उघड्यावर मद्यपान करु नये, असे आवाहन त्यांनी केले.