लोकसभेसाठी सर्वच तयार; पक्षश्रेष्ठींची लागणार कसोटी, मतदारसंघात गाठीभेटींवर भर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2024 08:12 AM2024-01-01T08:12:34+5:302024-01-01T08:12:53+5:30

चौदापेक्षा अधिक उमेदवार इच्छुक 

all set for lok sabha and party leaders will be tested | लोकसभेसाठी सर्वच तयार; पक्षश्रेष्ठींची लागणार कसोटी, मतदारसंघात गाठीभेटींवर भर

लोकसभेसाठी सर्वच तयार; पक्षश्रेष्ठींची लागणार कसोटी, मतदारसंघात गाठीभेटींवर भर

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : लोकसभा निवडणुकीच्या तिकिटासाठी भाजप व काँग्रेसमध्ये एकापेक्षा अधिक दावेदार तयार झाले आहेत. त्यामुळे श्रेष्ठींची कसोटी लागणार असून, तिकीट कोणाला मिळणार, याबाबत उत्कंठा आहे. इच्छुक असलेल्यांपैकी काहींनी मतदारसंघात गाठीभेटी घेत कामही सुरू केल्याचे दिसून येत आहे.

भाजपमध्ये दक्षिण गोव्यात माजी खासदार तथा एनआरआय आयुक्त अॅड. नरेंद्र सावईकर, माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर, राज्यसभेचे माजी खासदार विनय तेंडुलकर दावेदार आहेत. तसेच काँग्रेसमध्ये विद्यमान खासदार फ्रान्सिस सार्दिन, एल्विस गोम्स आणि माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर इच्छुक आहेत. गिरीश यांच्याकडे श्रेष्ठींनी नुकतीच ईशान्येतील चार राज्यांची जबाबदारी दिलेली आहे.

आरजीचे काम सुरू

आरजीने उमेदवार जाहीर करण्याच्या बाबतीत आघाडी घेतलेली आहे. पक्षप्रमुख मनोज परब हे उत्तर गोव्यातून, तर पक्षाचे खजिनदार रुबर्ट परैरा हे दक्षिण गोव्यातून निवडणूक लढवणार आहेत. दोन्ही उमेदवार अधिकृतरीत्या जाहीर झालेले असून, आरजीने दोन्ही मतदारसंघांमध्ये कामही सुरू केले आहे.

उत्तर गोव्यातही चुरस

उत्तर गोव्यात भाजपमध्ये विद्यमान खासदार तथा केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक, माजी मंत्री दिलीप परुळेकर, माजी आमदार दयानंद सोपटे, माजी आमदार जयेश साळगावकर तिकिटासाठी इच्छुक आहेत. काँग्रेसमध्ये माजी केंद्रीय कायदामंत्री रमाकांत खलप, विजय भिके हे तिकिटासाठी दावेदार आहेत.

तिकीट देण्यासाठी पक्षाची विशिष्ट पध्दत आहे. आधी सर्वेक्षण केले जाते. पक्षाच्या प्रदेश निवडणूक समितीकडून केंद्रात नावे पाठवली जातात व पक्षाचे केंद्रीय संसदीय मंडळ अंतिम निर्णय घेत असते. तशीच प्रक्रिया राबविली जात आहे. - सदानंद शेट तानावडे, भाजप प्रदेशाध्यक्ष तथा खासदार

 

Web Title: all set for lok sabha and party leaders will be tested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.