पणजी : कर्नाटकने रोखल्याने तामनार प्रकल्प जरी गोव्यात आला नाही तरी पर्यायी व्यवस्था म्हणून पश्चिम ग्रीड कडून वीज आणण्याची तयारी सरकारने चालवली आहे. १२०० मेगावॅट वीज आणण्यासाठी काम प्रगतीपथावर असून येत्या ऑगस्टपर्यंत ते पूर्ण होईल, असे वीज मंत्री सुदिन ढवळीकर यांनी सांगितले.
छत्तीसगढ येथून कर्नाटकमार्गे तामगारच्या वीजवाहिन्या येणार होत्या. या प्रकल्पासाठी दक्षिण गोव्यात स्थानिकांचा विरोध आहेच शिवाय कर्नाटकनेही हा प्रकल्प पर्यावरणाच्या नावाखाली रोखला आहे. त्यामुळे या प्रकल्पाचे भवितव्य आता अधांतरी आहे. गोवा सरकारने त्यामुळे पर्यायी चाचणी सुरू केली.
ढवळीकर म्हणाले की १२०० मेगावॅट वीज आणण्यासाठी सरकारने मोठा खर्च करून आवश्यक त्या सुविधा उभ्या केलेल्या आहेत. त्या वाया जाऊ दिल्या जाणार नाहीत. पुढील पाच वर्षात गोव्याची विजेची गरज ३०० ते ४०० मेगा वॅटनी वाढणार आहे. त्यामुळे आम्हाला बाहेरून आणखी वीज आणावीच लागेल. या पायाभूत सुविधा पश्चिम ग्रीडमधून वीज आणण्यासाठी वापरल्या जातील.
कॉल सेंटरमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे दरम्यान कॉल सेंटर मध्ये वीज ग्राहकांचे कॉल स्वीकारले जात नसल्याच्या किंवा दुरुत्तरे देत दिली जात असल्याच्या तक्रारी आहेत त्याकडे लक्ष वेधले असता मंत्री म्हणाले की, पुढील दोन- ते तीन दिवसात कॉल सेंटरमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जातील. तसेच खात्याच्या साइटवर तक्रार नोंदवता येईल. त्यामुळे थेट मुख्य अभियंत्यांना संदेश जाईल व ते संबंधित विभागातील कार्यकारी अभियंत्याकडून वीज दुरुस्तीचे काम करून घेतील.