पणजी : मी नेहमीच माझ्या पक्षाचा म्हणजे भारतीय जनता पक्षाचा आदेश मानत आलो आहे. पक्षाने सभापतीपद स्वीकारण्याची सूचना केली तेव्हा सभापतीपद स्वीकारले. आता मी मंत्रिपद स्वीकारावे असे भाजपला वाटल्याने मी ती जबाबदारी स्वीकारत आहे, असे राजेंद्र आर्लेकर यांनी बुधवारी येथे ‘लोकमत’ला सांगितले. गुरुवारी सकाळी आर्लेकर सभापतीपदाचा राजीनामा देणार असून सायंकाळी ५ वाजता मंत्री म्हणून राजभवनवर त्यांचा शपथविधी होणार आहे. गेली साडेतीन वर्षे मी सभापती म्हणून काम केले. पदाला न्याय दिला. सभापती म्हणून काम करतानाही मी पेडणे मतदारसंघात अनेक विकासकामे मार्गी लावली. पेडणेतील मतदारांनी मला निवडून दिल्याने त्या मतदारसंघात मी विविध उपक्रम राबविले. आता मंत्री बनल्यानंतर विकासकामे मार्गी लावणे जास्त सोपे व सुलभ होईल, असे आर्लेकर म्हणाले. दरम्यान, आर्लेकर यांनी सभापतीपद सोडल्यानंतर उपसभापती अनंत शेट हे गोवा विधानसभा सभागृहाचे प्रमुख बनतील. नवे सभापती म्हणून शेट यांची निवड करण्यासाठी विधानसभेचे एकदिवसीय अधिवेशन बोलवावे लागणार आहे. सभापतीपदाची निवडणूक घेण्यासाठी हंगामी सभापती म्हणून एखाद्या ज्येष्ठ आमदाराची नियुक्ती केली जाईल. आर्लेकर हे बालपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहेत. प्रथम ते वास्को मतदारसंघातून निवडून आल्यानंतर गोवा औद्योगिक विकास महामंडळाचे चेअरमन बनले होते. ते कधीच मंत्री बनले नव्हते. २०१२ साली त्यांनी पेडणे मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवली व भरघोस मतांनी ते जिंकले. मनोहर पर्रीकर यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर नवे मुख्यमंत्री म्हणून आर्लेकर यांचेच नाव पुढे आले होते. तथापि, नंतर त्यांचे नाव मागे पडले व लक्ष्मीकांत पार्सेकर हे मुख्यमंत्री झाले. मंत्रिमंडळातील एक रिक्त जागा भरण्यासाठी प्रयत्न सुरू झाले, तेव्हा प्रथम अनंत शेट यांचे नाव मंत्री म्हणून पक्षातून पुढे आले होते. तथापि, नंतर पक्षाने व पर्रीकर यांनी आर्लेकर यांच्या नावावर मंत्री म्हणून शिक्कामोर्तब केले. (खास प्रतिनिधी)
नेहमी पक्षाचा आदेश मानला : आर्लेकर
By admin | Published: October 01, 2015 1:35 AM