सोनसडो परिसरात नायट्रोजन व सल्फर डायोक्साईडचे प्रमाण वाढले
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2019 07:49 PM2019-06-04T19:49:05+5:302019-06-04T19:49:24+5:30
प्रदूषण नियंत्रण मंडळाने या परिसरातील वायू प्रदुषणाचे निरीक्षण केले आहे, त्यातून हे सिद्ध झाले आहे.
मडगाव: मोठ्या प्रमाणावर प्लास्टीकचा समावेश असलेल्या कच-याची रास मागील आठ दिवस सोनसड्यावर आगीमुळे धुमसत असल्याने या परिसरातील वायुतील नायट्रोजन डायोक्साईड व सल्फर डायोक्साईड या विषारी वायूचे प्रमाण प्रचंड वाढले असून त्यामुळे या परिसरातील लोकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
प्रदूषण नियंत्रण मंडळाने या परिसरातील वायू प्रदुषणाचे निरीक्षण केले आहे, त्यातून हे सिद्ध झाले आहे. या परिसरातील वायुतील पीएम-10 चे प्रमाण प्रत्येक क्युबिक मीटरमागे शंभर मायक्रोग्रॅम असण्याची गरज असताना या प्रदुषणामुळे हे प्रमाण 444 वर पोहोचले आहे तर पीएम-2.5 चे प्रमाण जे 60 मायक्रोग्रॅम सुरक्षित मानले जाते ते प्रमाण दर क्युबिक मीटरमागे 265 मायक्रोग्रॅम एवढे वाढले आहे.
या परिसरातील वायु प्रदूषण मोजण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाने तीन ठिकाणी यंत्रणा बसविलेली असून जी सोनसडय़ापासून 200 ते 300 मीटर अंतरावर आहे. त्यापैकी एक यंत्र पशु संवर्धन इस्पितळाजवळ, दुसरे कार एक्सप्रेस या आस्थापनाजवळ तर तिसरे प्रभाग 7 मधील एका घरात ठेवलेले आहे. या तिन्ही ठिकाणी प्रदूषण वाढल्याचे दिसून आले आहे.
दरम्यान, या प्रदुषणामुळे या परिसरातील लोकांमध्ये ब्रोंकायटीस, अस्थमा सारखे विकार जडू शकतात असा इशारा स्थानिक डॉक्टरांनी दिला आहे. 28 मे पासून या भागात आग धुमसत असून त्यामुळे सोनसडय़ाबरोबरच बाकभाट व गांधीनगर या परिसरातील लोकांना धुराचा त्रस सहन करावा लागत आहे. त्यामुळे या परिसरातील कित्येक रहिवाशांनी सध्या दुसरीकडे तात्पुरता आसरा घेतला आहे.
अग्नीशमन दलाचा जवान अस्थव्यस्त
मागचे आठ दिवस सोनसडय़ाच्या या आगीकडे दोन हात करताना अग्नीशमन दलाचेही जवानांना धुराचा त्रास सहन करावा लागत असून दोन दिवसांपूर्वी हे आग विझविण्याचे काम करताना एका जवानाला श्र्वासोश्र्वास घेण्यास त्रास सुरु झाल्याने त्याला तातडीने इस्पितळात हलविण्यात आल्याची माहिती अग्नीशमन दलाचे अधिकारी गील डिसौजा यांनी दिली. सदर जवानाला नंतर इस्पितळातून डिस्चार्ज देण्यात आला असला तरी सध्या त्याला घरी विश्रंती घेण्याचा सल्ला देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.