राज्यातील एटीएम दिव्यांगांसाठी गैरसोयीचे! सर्वेक्षणातून माहिती समोर
By वासुदेव.पागी | Published: May 29, 2023 10:58 AM2023-05-29T10:58:12+5:302023-05-29T10:58:42+5:30
एटीएम व्यवस्थेच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार शहरातील केवळ २६ टक्के एटीएमना रॅम्पची सोय आहे.
वासुदेव पागी, लोकमत न्यूज नेटवर्क पणजी :गोवा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (जीम)च्या विद्यार्थ्यांनी गोव्यातील एटीएमविषयी केलेल्या एका सर्वेक्षणातून राज्यातील बहुसंख्य एटीएम हे दिव्यांग व्यक्तींसाठी गैरसोयीचे असल्याचे म्हटले आहे. संबंधित बँकांनी दिव्यांगांना वापरण्यासाठी सोयीचे ठरतील, अशा कोणत्याही उपाययोजना राबविल्या नसल्याचे समोर आले आहे.
विद्यार्थ्यांकडून राज्यातील काही शहरातील आणि ग्रामीण भागातील विविध २६ बँकांच्या एकूण ९८ एटीएमचा अभ्यास केला. त्यात १३ ग्रामीण भागातील बँका आहेत तर १३ शहरातील बँका आहेत. गावातील एटीएम ही लोकांना जाण्यास सोयीस्कर आहेत, तर शहरातील गैरसोयीचे आहेत. शहरात अनेक एटीएम हे पदपथावरच आहेत. त्यामुळे एटीएमच्या दारातच वाहने पार्क करण्यात येत असल्यामुळे दिव्यांग व्यक्तींना खूप त्रास होतो. काहींना तर एटीएमपर्यंत पोहोचणेच अशक्य होते. त्यामुळे योग्य एटीएम मिळेपर्यंत त्यांना फिरत राहावे लागते. एटीएम कुठे आहेत याचे सूचना फलकही लावण्यात आलेले नाहीत, असेही सर्वेक्षणात म्हटले आहे. अंध व्यक्तींसाठी ब्रेल लिपीचा वापर ४९ टक्के एटीएममध्ये आहे.
एटीएम व्यवस्थेच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार शहरातील केवळ २६ टक्के एटीएमना रॅम्पची सोय आहे. त्यामुळे पार्क केलेल्या वाहनांच्या मधून मार्ग काढत जावे लागते.
या सर्वेक्षणात अक्षता भट्टाचार्य, अभिषेक राजन, आकांक्षा राज, अमित डोवल, आनंदी वस्त आणि अन्हाड सिंग या विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. प्रो. व्ही. पद्मनाभन यांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्वेक्षण झाले. बँक कर्मचायांना दिव्यांगांच्या गरजांसंबंधी प्रशिक्षण देण्यात यावे आणि दिव्यांगांच्या हक्कांबद्दल जागृती करण्यात यावी अशा शिफारशीही त्यात करण्यात आल्या आहेत.